ए खुदा तेरा शोरूम इतना तो तेरा… उल्हास पाटलांची शेरोशायरी; गिरीश महाजन म्हणाले वन्स मोअर
भाजपा जळगाव जिल्हा लोकसभा आढावा बैठकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या शेरोशायरीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खुष झाले. दुसरीकडे त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी किती जणांना संपविले हे मी देखील सांगू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे.
जळगाव | प्रतिनिधी, 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची जळगाव जिल्हा आढावा बैठक आज जळगाव शहरात पार पडली. काँग्रेसमधून भाजपात आलेले डॉक्टर उल्हास पाटील या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. डॉ. उल्हास पाटील यांनी केलेल्या शेरोशायरीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अवाक झाले आणि त्यांनी त्यांना चांगलीच दाद देत वन्स मोअर म्हटले. उल्हास पाटील यांनी फटकेबाजी करताना म्हटले की कॉंग्रेस असताना एवढ्या गर्दीची सवय नव्हती आणि शेर पेश केला. ‘ए खुदा तेरी भी क्या कमाल है…तेरा शोरूम इतना है…तो तेरा गोडाऊन कितना… असा शेर पाटील यांनी गर्दीला उद्देशून पेश केला. आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खुश झाले आणि त्यांनी वन्समोअर म्हटले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्रही विचारत नव्हते, त्यावेळी मी पक्ष वाढवला असे विधान एकनाथ खडसे यांनी केले होते. या वक्तव्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार समाचार घेत एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका करीत त्याचं सगळं मागचं पुढचं काढलं आहे. पक्षात असताना आपण काय काय केले. कुणा, कुणा विरोधात षडयंत्र केले हे सांगण्याची गरज नाही. या सर्व गोष्टीचा आपण साक्षीदार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तुम्ही कोणा कोणाला संपवलं, हे आम्हाला बोलायला लावू नका अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या टीका केली आहे.
रक्षा खडसे यांना तिकीट… आमच्या मनात दुजाभाव नाही
भाजपमध्ये असताना खासदारकीसह असतील नसतील तेवढी पदे आपल्याच घराने भोगली. केवळ एकदा अपयश आल म्हणून तुम्ही पक्ष बदल केला, ही तुमची कोणती पक्ष निष्ठा ? पक्षाने तुम्हाला एवढे दिलं…आठ आठ दहा वर्षांनी लाल दिव्यांच्या गाड्या वापरल्या. आठ दहा मंत्रीपद तुम्हाला दिली, तरी तुम्ही पक्षाची तुलना कुत्र्याप्रमाणे करत असाल तर आम्ही कुणीही खपवून घेणार नाही. तरीही आमच्या मनामध्ये कुठलाही दुजाभाव नाही. लोक म्हणत होते की यावेळेस रक्षा खडसे यांना तिकीट मिळणार नाही. या कुटुंबाशी माझे आग आणि पाण्याचे संबंध असताना रक्षा खडसे यांना तिकीट दिले. त्यामुळे पक्षाबद्दल बोलताना तुम्ही तोंड सांभाळून बोललं पाहिजे, यापुढे आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही यावेळी गिरीश महाजन यांनी दिला आहे.