आमदारांनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचाही उदयनराजेंना विरोध
सातारा : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जागावाटपाची चर्चा सुरु असली तर पक्षांतर्गत वाद मात्र सुरुच आहेत. साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबर आता तळागळातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा विरोध होताना पाहायला मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. याअगोदर आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]
सातारा : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जागावाटपाची चर्चा सुरु असली तर पक्षांतर्गत वाद मात्र सुरुच आहेत. साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबर आता तळागळातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा विरोध होताना पाहायला मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. याअगोदर आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंची तक्रार केली होती. शिवाय उमेदवारीलाही विरोध केला होता. आता कार्यकर्त्यांचाही विरोध पाहायला मिळतोय.
उदयनराजे भोसले हा पत्ता निवडणुकीत चालणारच याची खात्री असलेले शरद पवार सुद्धा उदयनराजेंच्या उमेदवारीवर सावध पावलं टाकत आहेत. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन उदयनराजेंना तिकीट न देण्याची मागणी केली. यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असा शब्द पवारांनी शिष्टमंडळाला दिलाय. तसेच सातारा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांनी बैठक घेऊन उदयनराजेंच्या उमेदवारीस विरोध दर्शवत काम न करण्याचा ठाम निर्णय घेतलाय. यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारी बाबत उघडपणे विरोध होताना पाहायला मिळतोय.
उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. यामुळे चक्क उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगावच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांच्या नाराजीवर राजेंना प्रतिक्रिया विचारली असता कोणताही आमदार माझ्यावर नाराज नसून मीडियानेच अशा पद्धतीचे तर्कवितर्क लावले असल्याचं ते म्हणाले.
उदयनराजेंच्या भेटीबाबत शशिकांत शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय. उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारले असता, कोरेगावचे शशिकांत शिंदे यांनी साशंक प्रतिक्रिया दिली. पवार साहेबांचा निर्णय आम्हाला बंधनकारक असून काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपचे काम करत असल्याने काही ठिकाणी नाराजी दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले.
उदयनराजेंबाबत आता तळाच्या फळीतील कार्यकर्तेच विरोध करायला लागल्यामुळे शरद पवार आणि पर्यायाने आमदारांची सुद्धा उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत गोची झाली आहे. उदयनराजेंच्या उमेदवारीची संकटं दूर होण्यापेक्षा त्यांच्या संकटात अजून वाढच होत आहे. उदयनराजे हे भाजपासोबत दुसरा संसार मांडणार की राष्ट्रवादीचं तिकीट मिळवण्यात यशस्वी होणार हे पाहणं जेवढं महत्वाचं असेल, तेवढंच या सर्व प्रकारात शरद पवार काय तोडगा काढतात हे सुद्धा आता महत्त्वाचं आहे.