भगवान गडावर प्रचंड राजकीय खलबतं, गोपीनाथ मुंडेंच्या गडात काँग्रेस-राष्ट्रवादीची घुसखोरी? 3 बडे नेते अचानक नतमस्तक! माध्यमांपासून काय लपवलं?
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावर राजकीय मेळाव्यांना बंदी घालण्यात आली. पंकजा मुंडे सध्या सावरगाव इथल्या भगवान भक्तीगडावर मेळावा घेतात. पण मागील दोन दिवसांतील राजकीय हालचालींवरून भगवान गडावरचं राजकीय वारं वेगळेच संकेत देतंय.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः गेल्या काही वर्षांपासून भगवान बाबांचे भक्त, पंकजा मुंडे आणि दसरा मेळावा (Pankaja Munde) हे समीकरण बनलंय. यंदाही दसरा मेळाव्याला भगवान भक्ती गडावरून पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगार आणि भगवान बाबांच्या (Bhagwan Baba) भक्तांना मार्गदर्शन केलं. पण दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून भगवान गडावर प्रचंड राजकीय खलबतं सुरू झालीत. खरं तर भगवान गड हा भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा मानला जातो. पण मागील दोन दिवसांतील राजकीय हालचालीनंतर हा गड धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) हाती जातो की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झालीय.
दसरा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मराठवाडा विभागीय ओबीसी मेळावा बीडमध्ये आयोजित करण्यात आला. नाना पटोले हे भगवानगड येथे जाऊन नतमस्तक झाले. एवढेच नाही भगवानगडाचे महंत शास्त्री महाराज यांच्या सोबत चर्चाही केली.
या गोष्टीला दोन दिवस होतात तोच माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आज भगवानगडावर जाऊन भगवान बाबांच्या समाधीवर नतमस्तक झाले. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान गडावर नाना पटोले पहिल्यांदाच आलेत. त्यानंतर काल धनंजय मुंडेही भगवान गडावर गेले. धनंजय मुंडे याआधीही गडावर गेलेत, पण यावेळी त्यांनी माध्यमांपासून मुद्दामहून राखलेला दुरावा हे मोठं रहस्य बनलंय.
लोकनेते गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातल्या भगवानगडावरून दसरा मेळाव्यानिमित्त ऊसतोड मजुरांना संवाद साधायचे. मात्र त्यांच्या जाण्यानंतर भगवान गडावरील राजकीय मेळावा हा खंडित झाला. त्यांची कन्या भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर मेळावा घेतात. तर धनंजय मुंडे हे माहूरगड येथे दर्शनाला जातात.
विशेष म्हणजे, रविवारी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवारांसह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला मराठवाड्यातील सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्याची उपस्थिती होती.
अभिष्टचिंतन सोहळा संपल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे आज सायंकाळी भगवान गडावर जाऊन नतमस्तक झाले. भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या सोबत चर्चा केली.
महंत नामदेव शास्त्री यांनी याआधी पंकजा मुंडे यांना राजकीय मेळावा घेण्यास बंदी घातलेली आहे. गडाचे अनुयायी पाहता, गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून गडावरून केले जाणारे राजकारण बीड जिल्ह्याचे सत्ताकेंद्र ठरलेले आहे.
आशा वेळी महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत धनंजय मुंडे यांची नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप बाहेर आलं नाही. महंत धनंजय मुंडे हे दोघे चर्चा करत असताना माध्यमांना मात्र तेथे जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नेमकं धनंजय मुंडे आणि महंत शास्त्री महाराज यांच्यात काय संवाद झाला याची उत्कंठा राज्यात शिगेला पोहोचली आहे.
भगवानगडावर पोहोचताना धनंजय मुंडे व जयंत पाटील यांचं प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. एवढेच नाही तर भगवान गडावर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
पहिल्यांदा आज धनंजय मुंडे गडावर जात असताना त्यांचं वाहन गडाच्या पायथ्याशी ठेवून चालत गेले. यावेळी हजारो समर्थक त्यांच्यासोबत होते त्यामुळे धनंजय मुंडे यांना हा गड पुन्हा एकदा चालविणार का? अशी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.