यवतमाळ ते बारामती 600 किमी पायी प्रवास, कार्यकर्त्याला पवारांनी दिला 2 तासांचा वेळ, भेटीनंतर कार्यकर्ता भावूक
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ ते बारामती असं 600 किमी अंतर पायी चालत आलेल्या संजय खंदारे देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ ते बारामती असं 600 किमी अंतर पायी चालत आलेल्या संजय खंदारे देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल दोन तास शरद पवार यांनी संजय खंदारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. ज्या नेत्यावरील प्रेमापोटी चालत आलो तो माझा विठ्ठलच मला साक्षात भेटला अशी प्रतिक्रिया देत संजय खंदारे अक्षरश: भावूक झाले. (After Sharad Pawar meet NCP activist Khandare became emotional)
शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवासाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा येथून बारामतीपर्यंत पायी चालत येत संजय खंदारे यांनी शरद पवार यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. ही बाब संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड आणि अमोल काटे यांनी शरद पवार यांना कळवली. शरद पवार यांनी संजय खंदारे यांना भेटण्यासाठी पुण्यात मोदीबाग येथील निवासस्थानी बोलावलं आणि तब्बल दोन तास त्यांच्याशी संवाद साधला.
विदर्भातील शेती प्रश्नासह संजय खंदारे यांच्या कुटुंबाबद्दल शरद पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांच्या यवतमाळ ते बारामती पायी चालण्याच्या उपक्रमाबद्दल माहिती घेतली. या सर्व संवादात संजय खंदारे भावुक झाले होते.” माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण आहे. कारण ज्या पवारसाहेबांची कारकीर्द लहानपणापासून पाहत आलो, त्या माझ्या विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटलो यापेक्षा मोठा आनंद तो काय?”, अशी प्रतिक्रिया संजय खंदारे यांनी व्यक्त केली..
आपल्या नेत्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. मात्र त्या उपक्रमाची दखल घेतली जातेच असं नाही. मात्र शरद पवार यांनी यवतमाळ ते बारामती पायी चालत आलेल्या संजय खंदारे यांना भेटण्यासाठी वेळ देत तब्बल दोन तास त्यांच्याशी संवाद साधत त्यांचं वेगळेपण दाखवून दिलं.
(After Sharad Pawar meet NCP activist Khandare became emotional)
संबंधित बातम्या
भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू, अजित पवारांची साद