EVM विरोधातील मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या बुधवारी (31 जुलै) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. याआधीही राज यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या बुधवारी (31 जुलै) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. ईव्हीएमविरोधातील मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रीय पातळीवर मोठे आंदोलन उभे करणे हा या भेटीमागचा प्रमुख उद्देश आहे. याआधीही राज यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विविध राजकीय भेटीगाठी घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी-शाहांविरोधात लाव रे तो व्हिडीओचे हत्यार उपसले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी ईव्हीएमचे हत्यार उपसत मोदी शाहांना टार्गेट करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्या भेटीत पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात असं निवेदनही निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.
या भेटीगाठींनतर आता राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस कोलकाता दौऱ्यावर असणार आहेत. मंगळवारी 30 जुलैला राज ठाकरे कोलकात्याला जाण्यासाठी निघणार आहेत. त्यानंतर ते बुधवारी (31 जुलै) ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ईव्हीएमविरोधातील मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रीय पातळीवर मोठे आंदोलन उभे करणे हा प्रमुख उद्देश आहे. ममता बॅनर्जींना भेटल्यानंतर गुरुवारी (1 ऑगस्ट) ते मुंबईत परतणार आहेत.
विशेष म्हणजे ममता बनर्जी यांच्याप्रमाणे आणखी प्रमुख राजकीय नेत्यांनाही ते भेटणार आहेत. तसेच येत्या काही दिवसात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही भेटणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतही विधानसभा निवडणूक, ईव्हीएम यासह विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी येत्या 4 ऑगस्टला पुण्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचे काय धोरण असेल याची घोषणा करणार आहेत. तर दुसरीकडे ईव्हीएम विरोधात विविध पक्षांना एकत्रित करत राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचेही चर्चा आता रंगली आहे.
संबंधित बातम्या :
राज ठाकरे-सोनिया गांधी भेट : पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती?
दिल्लीत मोठी घडामोड, राज ठाकरे आणि सोनिया गांधींची भेट
EVM विरोधातील फॉरमॅलिटी पूर्ण केली, बाकी पुढे काय करायचं आम्ही बघू : राज ठाकरे