शिंदे गटाचा ठराव, प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेसवर टीका; निकालानंतर महाराष्ट्रात मोठ्या हालचाली
या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावरही होईल. राज्यातील आकडा 300च्या पलिकडे जाईल. ज्यांना यश मिळालं नाही त्या महाविकास आघाडी नेत्यांना अशी वक्तव्ये करावी लागतात. मोदी हे मजबूत नेतृत्त्व आहेत. दर अधिवेशनात इंडिया आघाडीचा गोंधळ करण्याची प्रथा आहे. पण त्यांचे मनोबल कमी झाले आहे. इंडिया आघाडीत फोटोसेशन होतं. पण त्याचं पुढे काहीच होत नाही. इंडिया आघाडीचं चिन्ह अजून ठरलं नाही. उद्या लोकसभेला कसं सामोरं जाणार? असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.
विनायक डावरुंग, प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 3 डिसेंबर 2023 : चार राज्यांचे निवडणूक निकाल लागले आहेत. चारपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता आली आहे. तर एका राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवता आली आहे. एका राज्यात सत्ता मिळवता आली असली तरी काँग्रेसला हातची दोन राज्य गमवावी लागली आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला जात आहे. महाराष्ट्रातही भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांनी जल्लोष केला आहे.
भाजपच्या विजयानंतर महाराष्ट्रात शिंदे गटाने कार्यकारिणीची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत तीन ठराव मांडण्यात आले. राज्यातील महायुती सरकारच्या कामाचा अभिनंदनाचा प्रस्ताव शिंदे गटाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारलं जावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. त्यानुसार राम मंदिर उभारलं जात असल्याने राम मंदिर उभारणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही या बैठकीत मांडण्यात आला. त्याशिवाय मिशन 45 चा प्रस्तावही मांडण्यात आला. लोकसभा निवडणुकीत 45 जागा निवडून आणण्याचा हा प्रस्ताव मांडला गेला. तीन राज्यात भाजपला मिळालेलं यश ही आगामी लोकसभेची नांदी आहे. राज्यात सुद्धा महायुती जोमाने काम करेल. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला आहे, असल्याचं सांगत मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला.
मोदींचीच जादू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधला. तीन राज्यातील दैदीप्यमान यश मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. काँग्रेस जिंकली असती तर काहीजण नाचले असते. हे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. एकाच राज्यात काँग्रेस जिंकली आहे. मोदींची जादू कमी झाली असं बोलत होते. मोदींना हरवण्याचा त्यांचा उद्देश होता. मोदींना आरोप प्रत्यारोप करून बदनाम करण्यासाठी ते एकत्र आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही
दरम्यान, अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपनं विक्रमी विजय मिळवला आहे. राजकारणाची पुढची दिशा ठरवणारा हा निकाल आहे. मोदींवर लोकांचा विश्वास आहे. लोकप्रियता वाढत चालली आहे. येत्या 2024 ला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यात शंका नाही. मोदी आणि अमित शहांनी कौशल्यानं नियोजन केलं. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचले. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. पण लोकांचा अजूनही राहुल गांधींवर विश्वास बसला नाही हे त्यातून सिद्ध होतंय. प्रियांका गांधी प्रचारात उतरल्या पण त्यांच्यावरही जनतेचा विश्वास नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
रेवंत रेड्डीमुळे विजय
तेलंगणात काँग्रेसवर खूप विश्वास ठेवला असं मला वाटत नाही. तिथल्या बीआरएसच्या नाराजी विरोधात काँग्रेसला फायदा मिळाला. काँग्रेस श्रेष्ठीमुळे तिथे काँग्रेसच्या जागा वाढल्या नाही. तर रेवंत रेड्डींच्या कष्टामुळे काँग्रेसला फायदा झाला आहे. बाकी तीन राज्यात स्थानिक नेत्यांचा विषय नव्हता, असंही ते म्हणाले.