‘फादर ऑफ लोकसभा’, देशातील पहिली लोकसभा निवडणूक, अध्यक्ष यांचे काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?

सायमन कमिशनच्या विरोधात अहमदाबादमध्ये मावळणकर यांनी बहिष्कार आंदोलनाचे नेतृत्व केले. पंढरपूरच्या प्रसिद्ध मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी झालेल्या सत्याग्रहाचे नेतृत्वही त्यांनी केले. मावळणकर यांनी सभागृहाची कामकाज कार्यपद्धती आणि त्याचे नियम घालून दिले. त्यामुळेच त्यांना 'दादासाहेब' ही उपाधी मिळाली.

'फादर ऑफ लोकसभा', देशातील पहिली लोकसभा निवडणूक, अध्यक्ष यांचे काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?
First Loksabha Speaker Ganesh MavlankarImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 8:34 PM

मुंबई : सुमारे दीडशे वर्ष ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडात असलेला भारत 1947 साली स्वतंत्र झाला. लोकशाही स्वीकारलेल्या स्वतंत्र भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ती 1952 साली. निवडणुकीत कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. तर, लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा पहिला बहुमान हा मराठी व्यक्तीला मिळाला. आजच्या काळात पंतप्रधान यांच्या कार्यालयातून लोकसभा अध्यक्ष यांना भेटीसाठी फोन येणे ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. पण, त्याकाळी पंतप्रधान नेहरू यांचा भेटीसाठी फोन आल्यावर ‘या खूर्चीचा मान मोठा आहे. त्यामुळे मीच काय इतर कोणताही अध्यक्ष कोणाच्याही दारात जाणार नाही.’ असा मराठी बाणाही त्या लोकसभा अध्यक्षांनी दाखविला होता. हा मराठी बाणा दाखविणारे पहिले लोकसभा अध्यक्ष होते गणेश वासुदेव मावळणकर.

नेहरू यांना निरोप पाठवला…

गणेश वासुदेव मावळणकर हे देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भेटीसाठी या असा निरोप अध्यक्ष यांना पाठविला. पण, लोकसभा अध्यक्ष माळवणकर यांनी ‘ मी संसद भवनाच्या अध्यक्षपदी बसलो आहे. या खुर्चीचा मन मोठा आहे. मी तुम्हाला भेटायला येणार नाही. पंतप्रधानांनीच त्यांना भेटायला यावे,’ असा निरोप धाडला. पंतप्रधान नेहरू यांनी लोकसभा अध्यक्ष यांचा मान राखून त्यांची भेट घेतली. आपल्या कार्यकाळात अनेक संसदीय परंपरा प्रस्थापित करणारे मावळणकर यांना ‘दादा साहेब’ नावाने ओळखले जात होते.

मावळणकर यांचा जन्म कुठे झाला?

गणेश वासुदेव मावळणकर याचे आजोबा हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे गावचे रहिवासी. पण, त्यांचे वडील वासुदेव हे निकारीनिमित्त वडोदरा येथे स्थायिक झाले होते. याच वडोदरा येथे गणेश मावळणकर यांचा 27 नोव्हेंबर 1888 रोजी जन्म झाला. पण, त्यांच्या जन्मानंतर वडिलांनी पुन्हा आपले गाव गाठले. त्यामुळे गणेश यांचे राजापूर या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर 1902 मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी अहमदाबाद गाठले. गुजरात कॉलेजमधून ते बी.ए. झाले आणि पुढील कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. याच दरम्यान त्यांचा विवाह सुशीला मावळंकर यांच्याशी झाला.

कायद्याची प्रॅक्टिस आणि राजकारणात प्रवेश

गणेश मावळणकर यांनी कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर ते पुन्हा अहमदाबादला गेले. तेथे त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. याच काळात त्यांनी सार्वजनिक कामात सहभाग घेण्यास सुरवात केली. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी ते भारावून गेले आणि त्यांनी स्वतःला सत्याग्रह चळवळीत झोकून दिले. 1921 मध्ये त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सोडली. ‘गुजरात विदयापीठ’मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरवात केली. मात्र या काळात त्यांनी पगार घेतला नाही. विनावेतन ते काम करत होते. याच काळात त्यांच्याकडे अहमदाबाद काँग्रेस स्वागत समितीचे सचिवपद चालून आले.

पहिली तुरुंगवारी ते नगरपालिका अध्यक्ष

पंढरपूरच्या प्रसिद्ध मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी झालेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले. महात्मा गांधी यांनी ‘मीठ सत्याग्रह’ आंदोलन सुरु केले होते. यात गणेश मावळणकर अग्रणी होते. हे आंदोलन करत असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. मात्र, जेलमध्ये असतानाही त्यांनी तेथील कैद्यांना सुधारण्याचे काम केले. जेलमधून सुटल्यानंतर मावळणकर यांनी अहमदाबाद नगरपालिकेच्या संघटनांसाठी काम सुरु केले. अहमदाबाद नगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. 1919 पासून 1937 पर्यंत ते नगरपालिका सदस्य होते. तर, 1930 ते 33 आणि 1935 ते 36 या दरम्यान ते नगरपालिका अध्यक्ष होते.

मुंबई प्रांत रचना

ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपामध्ये त्याकाळी बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी हा एक भाग होता. मुंबई प्रांताचे चार प्रशासकीय विभाग होते. यात पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक, पाकिस्तानातील सिंध प्रांत यांचा समावेश होता.

गुजरात विभागामध्ये मुंबई शहर, ठाणे, कुलाबा (रायगड), रत्‍नागिरी, अहमदाबाद, भरूच, खेडा, पंच महाल, सुरत, हे जिल्हे होते. तर, दख्खन विभागात अहमदनगर, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर हे जिल्हे होते. बेळगाव, विजापूर, धारवाड, उत्तर कानडा हे जिल्हे कर्नाटक विभागात तर सिंध विभागात हैदराबाद, कराची, शिकारपूर, थर आणि पारकर यांचा समावेश होता.

अहमदाबाद विभागातून विधान परिषदेचे सदस्य

भारताच्या घटनात्मक इतिहासातील महत्वाचा टप्पा म्हणजे 1935 चा भारत सरकार कायदा. या कायद्यात संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारण्यात आली होती. यानुसार प्रांताना स्वायत्तता देण्यात आली. या कायद्यान्वये विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन सभागृहे मुंबई प्रांतात 1937 मध्ये अस्तिवात आली.

मुंबई प्रांतामध्ये विधानसभा आणि विधान परिषद ही सभागृहे अस्तिवात येण्यापूर्वी गव्हर्नर हा मुंबई प्रांताचा प्रमुख होता. हा कायदा आल्यानंतर बाळ गंगाधर खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1937 ते ऑक्टोबर 1939 या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार केला. मुख्यमंत्री खेर यांच्या काळातच 1937 मध्ये गणेश मावळणकर हे विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे मुंबई प्रांतातील रत्नागिरी या जिल्ह्याऐवजी ते अहमदाबाद येथून निवडून आले होते. विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद आले. 1937 ते 1946 या काळात ते मुंबई विधानसभेचे अध्यक्ष होते.

केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य

1946 मध्ये गणेश मावळणकर यांची केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवड झाली. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि हंगामी संसदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1952 साली स्वतंत्र भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. अहमदाबादमध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचे नेतृत्व मावळंकर यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून अहमदाबाद मतदारसंघातून त्यांना लोकसभेत पाठविण्यात आले.

सभागृहाच्या कामकाजात नवे मापदंड

अहमदाबाद मतदारसंघातून विजयी होत गणेश मावळणकर संसदेत पोहोचले. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी मावळणकर यांचे नाव जाहीर केले. लोकसभेतील सर्व सदस्यांनी गणेश मावळणकर यांच्या नावाला एकमुखी पाठींबा दिला. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मावळणकर यांनी सभागृहाची कामकाज कार्यपद्धती आणि त्याचे नियम घालून दिले. त्यामुळेच त्यांना ‘दादासाहेब’ ही उपाधी मिळाली. तर, अनेकजण त्यांना ‘फादर ऑफ लोकसभा’ असेही म्हणू लागले. सभागृहाच्या कामकाजाबाबत आणि शिस्तीच्या नियमांसाठी ते कमालीचे आग्रही असत.

पंतप्रधान यांचीही भीती वाटत नव्हती

सभागृहात एखाद्या विरोधी पक्षाच्या सदस्याने कॅबिनेट मंत्र्याच्या संशयास्पद व्यवहारांसंदर्भात काही प्रश्न विचारले तर मंत्री उत्तर देण्यास टाळाटाळ करत. पण, अध्यक्ष या नात्याने मावळणकर यांनी कधीही कोणत्याही मंत्र्याला संरक्षण दिले नाही. उलट त्यांनी कितीही लाजिरवाणे असले तरी सरकारने विरोधी पक्षांच्या सदस्यांना उत्तर देणे भाग आहे असे निर्देश त्यांनी दिले. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नेहरू यांच्याही चुका दाखविण्यास ते कचरत नव्हते. 1953 मध्ये नेहरू यांनी सहा वटहुकुम काढले. मात्र, त्याची कल्पना लोकसभा सदस्यांना देण्यात आली नव्हती. सदस्यांनी यावर गदारोळ केला. त्यावर अध्यक्ष मावळणकर यांनी ‘ही सभागृहाची प्रतिष्ठा आणि हक्कांची केलेली पायमल्ली आहे’ असे खडे बोल सुनावले होते. तर, ‘प्रत्येक सदस्याला स्वतःचे मत व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, प्रत्येक सदस्याला समान स्वातंत्र्य आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

कार्यपद्धतींत आमुलाग्र बदल

लोकसभेचे अध्यक्ष झाल्यावर मावळणकर यांनी सभागृहाचे नियम, अधिवेशन, त्याची कार्यपद्धती निश्चित केली. सरकारी यंत्रणा सुरळीतपणे कसे काम करेल, त्याची सर्वोत्तम पद्धती कोणती याचा त्यांनी विचार केला. वेळोवेळी संसदेचे नियम, कार्यपद्धतींत आमुलाग्र बदल केला. प्रश्नोत्तराचा तास हा त्यांच्या काळातील एक महत्त्वाचा पैलू बनला. अल्पसूचना प्रश्न, अर्धा तास चर्चा ही संसदीय आयुधे ही त्यांचीच देण आहे. मावळणकर यांनी विपुल लेखनही केले आहे. कैद्यांच्या वास्तविक परिस्थितीवर त्यांनी गुजराती भाषेत ‘मानवता झरण’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे अन्य भारतीय भाषांमध्ये भाषांतरही झाले आहे. वकिलीच्या काळात घडलेल्या घटनांचे संकलन त्यांनी माय लाइफ या पुस्तकात केले आहे. अशा या ‘फादर ऑफ लोकसभा’ असलेल्या मावळणकर यांचे अहमदाबाद येथे 27 फेब्रुवारी 1956 रोजी निधन झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.