रत्नागिरी : वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) महाराष्ट्रातून (Maharashtra) गुजरातला (Gujarat) हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार लवकरच कोकणातील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पही आता राज्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहे. आरआरपीसीएल कंपनी तीन वर्षांपासून रिफायनरी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. मात्र रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कंपनीने प्रकल्प गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हा प्रकल्प 2018 पासून रखडला आहे. मात्र अद्यापही ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने कंपनी प्रशासन हा प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. विलंबामुळे प्रकल्पावर होणाऱ्या खर्चात देखील वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. हा प्रकल्प राज्यात झाल्यास या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.