अजित दादांच्या आदेशाने बारामतीत आलो, कृषीमंत्र्यांकडून स्तुतीसमनं
संपूर्ण मंत्रिमंडळात शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री असल्याचं कौतुक करत त्यांना 20-20 मॅच खेळावी लागेल, असंही सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
बारामती : राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादांनी आदेश दिल्यामुळे आपण बारामती पाहायला आलो, नसता इथं झालेलं काम पाहण्यापासून मुकलो असतो, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामावर स्तुतीसुमने उधळली. तर संपूर्ण मंत्रिमंडळात शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री असल्याचं कौतुक करत त्यांना 20-20 मॅच खेळावी लागेल, असंही सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
बारामती येथील कृषी विकास संस्थानच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय आणि कृषीविषयक कामांची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अनिल बोंडे हे सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी कृषी अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार हेही यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रत्येकाने काम केलं पाहिजे, असं सांगतानाच अजितदादांनी आपल्याला बारामतीत येण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आपण आज इथे आलोय. आलो नसतो तर बारामतीत होत असलेलं काम पाहण्यापासून मुकलो असतो, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बदलात डॉ. अनिल बोंडे यांना कृषीमंत्रीपदाची संधी मिळाली. खरं तर फार थोड्या काळासाठी त्यांना ही संधी मिळाल्याने 20-20 मॅच खेळावी लागणार असल्याचं सांगत, अजित पवार यांनी संपूर्ण मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री असल्याचं कौतुक केलं.