अहमदनगर : भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या कट्टर समर्थकाने पदाचा राजीनामा दिला. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर (Prasad Dhokarikar) यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजीनाम्याच्या पत्रात काय उल्लेख
भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना ढोकरीकरांनी पत्र लिहिले आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे पद सोडत असल्याचे प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले आहे. आजारपणामुळे आपल्याला जिल्ह्यात फिरता येणार नाही, असाही उल्लेख त्यांनी राजीनाम्यात केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केल्याबद्दल ढोकरीकरांनी ऋण व्यक्त केले आहेत. पदाचा राजीनामा दिला असला, तरी भाजपचा सक्रिय सदस्य राहणार असल्याचंही ढोकरीकर यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांसह उपस्थिती
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रसाद ढोकरीकर हे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसत आहेत. ढोकरीकर यांच्या व्यामशाळेचे उद्घाटनही रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले होते. पक्षाच्या अंतर्गत वादामुळे ढोकरीकरांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे ढोकरीकर यांची संघाशी जवळीक असून भाजपच्या दिग्गज नेत्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.
रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.
रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले.
संबंधित बातम्या :
अहमदनगरमध्ये रोहित पवारांचा राम शिंदेंना पुन्हा दणका
आधीच रोहित पवार, त्यात माजी नगराध्यक्षही बंडासाठी तयार, राम शिंदेंची धाकधूक वाढली