शिंदेंचा हट्ट, भाजपाची मोठी अडचण! अजय आशर नियुक्तीचा वाद पेटला, अंबादास दानवेंनी शेअर केला शेलार यांचा ‘तो’ व्हिडिओ
ते आशर तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले की तुमच्या पक्षाला 'खोके दर्शन' झाले? कारण त्यांना तुम्ही सत्तेचा लाभार्थी करून टाकलं, अशी चपराक अंबादास दानवे यांनी लगावली.
मुंबईः अजय आशर (Ajay Ashar) यांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकरमध्ये अजय आशर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपाने आता अजय आशर यांची एवढ्या महत्त्वाच्या पदावर कशी नियुक्ती कशी होऊ दिली, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आग्रहाखातर आशर यांची नुकतीच महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मात्र दानवे यांनी तीव्र आक्षेप घेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हिडिओच शेअर केलाय.
कोण आहेत अजय अशर?
महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या धर्तीवर नीती आयोगासारखा आयोग स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र असे त्याचे नाव आहे. मित्रच्या उपाध्यक्षपदी अजय आशर या बिल्डरची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने केली आहे…
नाना पटोलेंचा आरोप काय?
काँग्रेस, शिवसेना तथा महाविकास आघाडीने अजय आशर यांच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आशर यांच्या नियुक्तीमुळे राज्यसरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. आशरसारख्या चुकीच्या व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्र्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
@ShelarAshish तुम्हाला तुमच्याच व्हिडियोची आठवण करून द्यावी वाटली. ज्या अजय आशर यांच्यावर आपण आरोप केला, ते आशर तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले की तुमच्या पक्षाला ‘खोके दर्शन’ झाले? कारण त्यांना तुम्ही सत्तेचा लाभार्थी करून टाकलं! #ajayaashar #khokesarkar_khotesarkar pic.twitter.com/410XMV3vLx
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 3, 2022
विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाची गोची
महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात आशिष शेलार आणि मिहिर कोटेचा यांनी नगरविकास विभागाच्या कारभारात मंत्रालयाबाहेरील व्यक्ती असणाऱ्या अजय आशर यांचा हस्तक्षेप वाढल्याचा केला होता आरोप केला होता. अंबादास दानवे यांनी तोच व्हिडिओ ट्विट केला. नगरविकास विभागाचा कारभार चालवणारा आशर कोण? मंत्रालयात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या ते वर आहेत का? विभागाचे निर्णय अजय आशर घेतात का, असे प्रश्न शेलार यांनी त्या व्हिडिओत केले होते.
मात्र आता आशर यांना तुमच्या वॉशिंगमशीनमध्ये धुऊन काढले की तुम्हाला खोके दर्शन झाले, असा जहरी सवाल दानवे यांनी केलाय.
आशर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यास भाजपचा विरोध होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची आत्ता अडचण झाल्याचं दिसून येतंय.