Ajit Pawar : ‘..तर चव्हाणसाहेबांच्या समाधीसमोर दिवसभर बसावं लागतं’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वानुभव सांगितला!
आज सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा यांनी आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना जपून आणि तोलून, मापून बोलण्याचा सल्ला दिलाय. यावेळी त्यांनी आपला आत्मक्लेशाचा अनुभवही सांगितला.
सांगली : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केलीय. त्यावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु झालंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केतकी चितळेचा (Ketaki Chitale) तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केतकी चितळेच्या पोस्टबाबत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिलीय. ‘त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांना उपचार दिले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे’, असा जोरदार टोला अजित पवार यांनी शनिवारी लगावला होता. त्यानंतर आज सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा यांनी आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना जपून आणि तोलून, मापून बोलण्याचा सल्ला दिलाय. यावेळी त्यांनी आपला आत्मक्लेशाचा अनुभवही सांगितला.
अजित पवारांना स्वानुभव सांगितला!
अजित पवार म्हणाले की, ‘काम करताना काही गोष्टी कितीही आपल्या स्पष्ट बोलाव्या वाटत असल्या, पण त्यातून आपल्याला अडचणी निर्माण होणार असतील तर ते बोलण्याच्या नादी लागू नये. त्याचा फटका बसतो. मी तर खुप अनुभवलं आहे. कधी चुकीचा शब्द गेला तर दिवसभर चव्हाण साहेबांच्या समाधीपुढं जाऊन बसावं लागतं. हे मी मागं अनुभवलं आहे. त्यामुळे फार तोलुन, मापून पुढं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हे सतत स्मरणात ठेवा’, असा सल्ला त्यांनी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना दिलाय. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे यशवंतराव चव्हाण भुषण पुरस्कार 2022 चं वितरण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब पाटील, जयंत पाटील यांच्या उपस्थिती पार पडला.
केतकी चितळेवर खोचक टीका
दरम्यान, शनिवारी अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी केतकी चितळेच्या पोस्टबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्ष असेल किंवा कुणीही अशा पद्धतीनं वक्तव्य करु नये. मी अशा वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. अशा प्रकारचं वक्तव्य करणारे मनोरुग्णच म्हणावे लागतील. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांना उपचार दिले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी केतकीच्या पोस्टबाबत तिखट प्रतिक्रिया दिलीय.