तेच झालं, राष्ट्रवादीच्या आमदारांना भरभरून निधी; अर्थमंत्री होताच अजितदादा अॅक्शन मोडमध्ये
अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाच्या आमदारांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत आहेत. त्यांच्या आमदारांना अधिक निधी मिळत आहे.
मुंबई | 23 जुलै 2023 : अखेर ज्याची भीती होती तेच झालं. अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवार यांनी आपल्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवरही निधीची प्रचंड खैरात केली आहे. शिंदे गटाच्या आमदारांना निधी देऊन त्यांची नाराजी अजित पवार यांनी दूर केली आहे. मात्र, शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी देण्यात आल्याचं समजतंय. अजित पवार यांनी सुरुवातीलाच आपल्या आमदारांवर विकास निधीचा वर्षाव करून भविष्यातील निधी वाटपाचे संकेतच दिले असल्याचंही सांगितलं जात आहे.
अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विकास कामांसाठी 1 हजार 500 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यात आमदारांसाठी 25 ते 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रत्येकी 25 कोटींचा निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना तर 40 कोटींचा निधीही दिल्याचं समजतंय. शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे. मात्र, तुलनेने हा निधी कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यांना 40 कोटींचा निधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी पाठिंबा दिला होता. पण नंतर त्यांनी घुमजाव करून अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सरोज अहिरे यांच्या मतदारसंघासाठीही 40 कोटींचा निधी देण्यात आला आहे. निधी वाटपात अजित पवार गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना भरभरून निधी देण्यात आला आहे. त्यामुळे विकास निधीसाठीच आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची चर्चाही होत आहे.
पाटील तुपाशी, आव्हाड उपाशी
अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खोचक टीका केली होती. तर जयंत पाटील यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटल्याचं चित्रं अजित पवार गटाने रंगवलं होतं. त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार गटासाठी खलनायक ठरले होते. अजित पवार यांनीही पाटील यांच्यावर टीका केली होती.
मात्र, निधी वाटपात अजित पवार यांनी हात आखडता घेतला नाही. त्यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघासाठी भरभरून निधी दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दुसरे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी अद्याप निधी मंजूर केलेला नाही.
म्हणून विरोध होता
अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाच्या आमदारांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत आहेत. त्यांच्या आमदारांना अधिक निधी मिळत आहे. त्यामुळे शिवसेना संपत आहे. अजित पवारांच्या तावडीतून शिवसेना वाचवण्यासाठीच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचं त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितलं होतं.
आता तेच खातं अजित पवार यांच्याकडे गेल्यास मतदारसंघात काय सांगायचं? लोकांना काय सांगायचं? आपल्या बंडाला काही अर्थ राहील काय? असा प्रश्न या आमदारांना पडला होता. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध केला होता.