Ajit Pawar : ‘शेतकऱ्यांनो घाबरू नका आणि टोकाचा निर्णय घेऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी’, अजित पवारांचं आवाहन
ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे', अशा शब्दात अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय.
मुंबई : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात (Marathwada) अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशावेळी बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावच्या एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide) केलीय. त्यामुळे कारखानदार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन केलंय. ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका. ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दात अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय. जनता दरबार उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत. बीड जिल्हयात दु:खद घटना घडली आहे. आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली यावर बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने विश्वास दिला. तसंच सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सरकारला मान्य करावा लागतो. राजद्रोह कलमाचा वापर करु नका असे सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकारला सांगितले आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन केंद्रसरकार करणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘आम्हीही युपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो’
कार्यालय कुठे काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात. यूपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत त्याला आमचा विरोध नाही. आम्हीही युपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो, असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले.
‘हेडलाईन बनण्यासाठी पटोले बोलले असावेत’
नाना पटोले यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असेही अजित पवार यांनी सुनावले.
‘आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. 15 वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही’, असेही अजित पवार म्हणाले. मनसेचे बाळा नांदगावकर हे गृहमंत्र्यांना भेटले आहेत. प्रत्येकाला या राज्यात सुरक्षित वाटावं हे सरकारचं काम आहे. जी धमकी आली आहे किंवा जे काही माहिती त्यांनी दिली आहे त्याबाबत गृहमंत्री निर्णय घेतील. कुणाला संरक्षण दिले पाहिजे याबाबत एक समिती असते ते निर्णय घेतात हेही सांगितले.
पवारसाहेबांचे भाषण नीट ऐका, भाजपला सल्ला
भाजपचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. पवारसाहेबांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे. पण ते न दाखवता वेगळंच दाखवलं आहे, असेही अजित पवार यांनी पत्रकांरानी भाजपने प्रसारीत केलेल्या एका व्हिडीओवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
‘चंद्रकांत पाटील बोलले ते खरे’
शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत होते. तर भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून भाजपच्या बोलणार्या लोकांना संधी मिळाली आणि आम्हाला आमच्या साहेबांमुळे संधी मिळाली. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांचा करिष्मा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील बोलले ते खरे आहे. त्यांच्या बोलण्याला माझे अनुमोदन आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.