‘नाच्या’चं काम तुमचं नाही, अजित पवारांकडून गिरीश महाजनांचा ‘नाच्या’ असा उल्लेख
नाशिकमधील पुराच्या पाण्याकडे लक्ष देण्याऐवजी नाचणारे पालकमंत्री गिरीश महाजन हे 'नाच्या' आहेत, अशा शब्दात अजित पवारांनी तोफ डागली.
रायगड : मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयानंतर तुफान नाचणारे ‘संकटमोचक’ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी निशाणा साधला आहे. अजित पवारांनी महाजनांना ‘नाच्या’ असं संबोधलं.
नाशिकमध्ये पूर आला आणि मंत्रीमहोदय नाचतात. ‘नाच्या’चं काम तुमचं नाही मंत्री महोदय. तुम्ही पाण्याचं पाहावं, अशा शब्दात अजित पवार यांनी गिरीश महाजनांना टोला लगावला. जलसंपदा मंत्री असलेले गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्रीही आहेत.
राज्यात इतर पक्षांच्या यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरु आहे. संभाजी राजेंच्या मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा डॉ. अमोल कोल्हे यांना राज्यात फिरवत राष्ट्रवादी ही यात्रा काढणार आहे. याचवेळी राज्यातील पूर परिस्थितीवर बोलताना अजित पवारांनी गिरीश महाजनांवर शरसंधान साधलं.
पाणी बघितल्यावर माणसाला कळत नाही काय करावं. लोक अडचणीत आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. जनता पुरात आहे, आणि मुख्यमंत्री प्रचारात आहेत. यात्रा महत्त्वाची की महाराष्ट्रातील सामान्य माणूस? असा प्रश्न अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला पाहिजे. सगळे पालकमंत्री जिल्ह्यात जाऊन बसले पाहिजेत. यंत्रणा कामाला लावली पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.
चंद्रपूरला महाजनादेश यात्रा सुरु असताना तिथे चिखलात चाकं रुतली, सगळ्यांना उतरावं लागलं, रथ अडकला. पुण्यातील 6-7 ब्रिज बंद आहेत, आता नियंत्रण करता येत नाही. उजनीचं पाणी इतकं सोडलं, की पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाला पाणी लागलं, असं तुम्हाला वाचायला मिळेल, असंही अजित पवार म्हणाले.
केंद्राचा कलम 370 चा निर्णय चांगला आहे. त्याला आमचा विरोध नाही. आम्ही विरोधाला विरोध करत नाही. आता पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घ्या, हीच इच्छा असल्याचंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे शरद पवार एकबाजूला टीका करत असताना, दुसरीकडे अजित पवार कौतुक करत असल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत गटबाजीचं राजकारण पाहायला मिळालं. यात्रेच्या नियोजनाबाबत अनेक नेत्यांना विश्वासात घेतलं नसल्याचं समोर आलं आहे. संघर्ष यात्रेची धुरा सांभाळणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना यात्रेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं जात आहे.
भाजपने 2014 मध्ये ‘छत्रपती का आशीर्वाद’ घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती, आता राष्ट्रवादीने संभाजी राजेंच्या मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा डॉ. अमोल कोल्हे यांना राज्यात फिरवण्याचं नियोजन केलं आहे.