Ajit Pawar : कधी जायचं ते मी ठरवेन, उगाच मुख्यमंत्र्यांनी नाक खुपसू नये, अतिवृष्टीच्या पाहणीवरून अजित पवारांचा टोला
अजित पवार आता पूर ओसरल्यानंतर (Flood) पाहायला गेले आहेत, पूर आला होता तेव्हाच आम्ही जाऊन पाहणी करून आलोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लावला. मात्र त्यानंतर आता अजित पवारांनी ही मुख्यमंत्र्यांना तसंच प्रत्युत्तर दिलंय.
यवतमाळ : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. या पाहणी दरम्यान ते सतत सरकारला धारेवर धरत आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी ही अजित पवार यांनी केली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून हे ते रोज सरकारवर (Cm Eknath Shinde) तोफा डागत आहेत. तात्काळ अधिवेशन घ्यावं आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी अजित पवार सध्या जोर लावत आहेत. मात्र काही वेळापूर्वीच अजित पवारांच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. अजित पवार आता पूर ओसरल्यानंतर (Flood) पाहायला गेले आहेत, पूर आला होता तेव्हाच आम्ही जाऊन पाहणी करून आलोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लावला. मात्र त्यानंतर आता अजित पवारांनी ही मुख्यमंत्र्यांना तसंच प्रत्युत्तर दिलंय.
मी कधी जायचं मी ठरवेल
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मी विरोधीपक्ष नेता म्हणून दौरा करतोय, मी हाडाचा शेतकरी आहे. अधिवेशन सुरु होईल तेव्हा सांगायला सोपं जातं. तर मी कधी जावं हा माझा प्रश्न आहे, बाकीच्यांनी नाक खुपसू नये, आज मुख्यमंत्री पण म्हटले अजीत दादा उशीरा गेले, मी कधी जायचं मी ठरवेल. आज सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, हा कधी गेला? हे प्रश्न उपस्थित करुन नये, असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
बालीशपणासारखं विचारतात हा कधी गेला
तर पंचनामे सगळे झाले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झालंय. तुम्ही दोघे खंबीर असला तरीही 36 जिल्ह्यात पालकमंत्री नेमले तर ते तिथे जाऊन आढावा घेऊ शकतात. काही कमी पडलं तर इथून थेट मंत्रालयात संपर्क साधता येतो. हे आम्ही विचारतोय, पण याची उत्तरं देणं सोडून हे बालीशपणासारखं विचारतात हा कधी गेला, उशीरा गेला, कोण कधी गेला हे बघण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली आहे.
शेतकऱ्यांना मदत करा
या भागात जनावरांचा मृत्यू झाला, रस्त्यांची वाईट अवस्था आहे. पुन्हा पाऊस आला तर धरणातलं पाणी सोडलं तर नदीशेजारची गावात पाणी जाईल. त्यामुळे मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला रात्री धरणावर ठेवायला हवं. तसेच मजुरांना एक एक महिन्याचं धान्य द्यावं. मुख्यमंत्री गडचीरोलीला गेले तेव्हा पुलावरुन पाहणी केली, पाहणी करणे हे त्यांचे कामंच आहे. ख्यमंत्र्यांकडे विमान असते सरकारी यंत्रणा असते. त्यामुळे ते आधी पाहणीसाठी गेले हे त्यांचं काम आहे, अशी वक्तव्यं करण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी अजित पवारांनी केलीय.
कुठली खाती कुणाकडे तेही सांगा?
सगळी खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. फडणवीस यांनी स्पष्ट करावं की कुठली खाती त्यांच्याकडे आहे आणि कुठली मुख्यमंत्र्यांकडे आहे, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. तर शेतकऱ्यांना मदत द्यायचं माझ्या हातात नाही, शिंदे – फडणवीस यांच्या हातात आहे. म्हणून अधिवेशन घ्या म्हटलं, पण हे ना अधिवेशन घेतात, ना विस्तार करत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
किती मदतीची मागणी?
आता केंद्राच्या विचाराचे सरकार आलंय, आता केंद्राने मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी हेक्टरी 75 हजार रुपये मदत करावी ही आमची मागणी आहे. तसेच सरकारने यंदाचं पीक कर्ज माफ करायला हवं. तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी कायदेशीर अडचण येते की नाही हे माहित नाही. मात्र या दोघांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत दिल्लीतून निर्णय होत नाही मंत्रीमंडळ विस्तार होत नाही. त्यामुळे आम्ही दोघेच सांभाळतो असा केविलवाणा प्रयत्न यांना करावा लागेल, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.