‘चंपा’ हा शॉर्टफॉर्म सांगणाऱ्या मंत्र्याचं नाव निवडणुकीनंतर सांगणार: अजित पवार
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी (Ajit Pawar on Chandrakant Patil Short Form) महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या "चंपा" या शॉर्टफॉर्मविषयी मोठा खुलासा केला आहे.
पुणे: माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी (Ajit Pawar on Chandrakant Patil Short Form) महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या “चंपा” या शॉर्टफॉर्मविषयी मोठा खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म (Ajit Pawar on Chandrakant Patil Short Form) मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्यानेच सांगितला, असा दावा अजित पवारांनी केला. या मंत्र्याचं नाव मी निवडणूक झाल्यावरच सांगेन, असंही त्यांनी नमूद केलं. ते पुण्यात पत्रकार परिषेदत बोलत होते.
अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना चंपा असं संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. अगदी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या नावाचा पुण्यातील आपल्या जाहीर सभेत उल्लेख करुन चंपाची चंपी करणार असा टोला लगावला. मात्र, आता या शॉर्टफॉर्ममागे चंद्रकांत पाटील यांच्या स्वपक्षातीलच कुणी असल्याचं समोर आल्याने राजकीय तर्कवितर्क बांधले जात आहे.
अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी आधी एकतर्फी निवडणूक आहे असं भासवलं. मात्र, महाआघाडीच्या प्रचारसभांमध्ये तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पहायला मिळतो आहे. शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. भाजप-शिवसेनेने युती केलेली असली तरी अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये युती राहिलेली नाही. त्यामुळे तेथील निकाल वेगळे लागतील.”
सत्ताधारी फक्त कलम 370 चा मुद्दा निवडणुकीत आणत आहेत. मात्र, ही निवडणूक देशाची नाही, तर राज्याची निवडणूक आहे, असंही अजित पवारांनी नमूद केलं.