येड्या बाभळी काढायलाही आम्ही पवार कुटुंबीयच येतो : अजित पवार
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं बारामतीवर विशेष लक्ष असतं. शहरात त्यांना कुठेही अस्वच्छता दिसली की ते त्याच जागेवर संबंधितांना खडेबोल सुनावतात. शुक्रवारीही अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात बारामतीच्या नगराध्यक्षांना अस्वच्छतेवरुन कानपिचक्या दिल्या. एका गृहप्रकल्पाच्या भूमीपूजनप्रसंगी अजित पवार यांना एका जागेत मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढलेली दिसली. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आपण नगरपरिषदेला […]
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं बारामतीवर विशेष लक्ष असतं. शहरात त्यांना कुठेही अस्वच्छता दिसली की ते त्याच जागेवर संबंधितांना खडेबोल सुनावतात. शुक्रवारीही अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात बारामतीच्या नगराध्यक्षांना अस्वच्छतेवरुन कानपिचक्या दिल्या. एका गृहप्रकल्पाच्या भूमीपूजनप्रसंगी अजित पवार यांना एका जागेत मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढलेली दिसली. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आपण नगरपरिषदेला जेसीबी उपलब्ध करुन दिलाय तरीही अशा बाभळी वाढत असतील तर आता आम्ही पवार कुटुंबीयांनीच स्वच्छता करायला यायचं का? असा सवाल करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
बारामती शहरातील चिराग ईलाईट या गृहप्रकल्पाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, शरयु फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शहरातील परिसरासह सर्वच शासकीय कार्यालयांमध्येही स्वच्छता राहिली पाहिजे अशी सूचना केली.
यावेळी बोलत असतानाच त्यांना समोरच्या बाजूला असलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात बाभळी वाढलेल्या दिसल्या. त्याबाबत अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आता इथे समोरच येड्या बाभळी उगवल्यात.. बारामतीकरांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण एका कंपनीकरवी जेसीबी उपलब्ध करुन दिलाय ना.. मग त्या येड्या बाभळी काढा ना.. का आता मी आणि साहेब येऊन थांबून येड्या बाभळी काढू.. आता तेवढंच राहिलंय.. आणि सुप्रियाला सांगतो बघ निघाल्यात का बाभळी… ज्यांनी त्यांनी आपली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे.. आमची काही अपेक्षा नाही, आम्ही लवकर उठून कामाला लागतो.. पण त्या कामातून रिझल्ट दिसलेच पाहिजेत, असं सांगत अजितदादांनी नगराध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
शरयु फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी श्रीनिवास पवार यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला. त्यावर कोटी करताना अजित पवार यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. एसटी नाही मिळाली म्हणून श्रीनिवास आणि त्यांचे मित्र चंद्रवदन हे दोघे चालत काटेवाडीला गेले होते. तेव्हापासून आपण या दोघांनाही चिडूनच देत नाही. पुन्हा राग आला आणि ते जर कन्याकुमारीपर्यंत चालत गेले तर आपलं कसं होईल, असा सवाल उपस्थित करत ते दोघेही शांत कसे राहतील याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.