मोठी राजकीय घडामोड ! अजित पवार यांच्यासह सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला; पवार बॅकफूटवर येणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व बंडखोर आमदार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आलं आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील आणि इतर आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत.
मुंबई | 17 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तासभर ही बैठक चालली होती. आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत. यावेळी पवार या आमदारांशी संवाद साधणार असून या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व बंडखोर आमदार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आलं आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील आणि इतर आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. शरद पवार हे सिल्व्हर ओकवर आहेत. तिथून ते वायबी चव्हाण सेंटरला निघाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे चव्हाण सेंटरला पोहोचत आहेत. जयंत पाटीलही चव्हाण सेंटरकडे यायला निघाले असल्याचं सांगितलं जात आहे.
सलग दुसऱ्या दिवशी भेट
दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काल सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ती भेट नियोजीत नव्हती. आज मात्र, आमदार चव्हाण सेंटरवर आल्याने स्वत: शरद पवार चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत. त्यामुळे आजची भेट नियोजित असल्याचं सांगितलं जात आहे. काल शरद पवार यांनी मंत्र्यांशी एका शब्दानेही संवाद साधला नव्हता. असं असतानाही आमदार पवारांच्या भेटीला आले. तसेच शरद पवार हे सुद्धा घरातून चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदार आणि शरद पवार यांच्यात काही तरी खिचडी शिजत असल्याचं सांगितलं जात आहे.
पवार बॅकफूटवर येणार?
दरम्यान, सर्व आमदार आणि मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे आमदार शरद पवार यांना गुंता सोडवण्याची विनंती करणार आहेत. त्यामुळे शरद पवार बॅकफूटवर जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीत पुन्हा समेट होणार का? झाला तर तो कशा पद्धतीने असेल? शरद पवार भाजपसोबत जाणार का? की शरद पवार पक्षावरील दावाही सोडणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरं थोड्याच वेळात मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.