फक्त ही गोष्ट केली अन् सात मते फुटली… अजितदादांनी सांगितली विधान परिषद निवडणुकीची इन्साईड स्टोरी
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. अजितदादा गटाने काँग्रेसची सहा मते फोडून आपला उमेदवार विजयी केल्याची चर्चा होती. त्याला आज अजित पवार यांनीच दुजोरा दिला आहे. नेमकं हे कसं घडलं? आमदार गळाला कसे लागले? याची माहितीही त्यांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या 9 पैकी 9 जागा जिंकून आल्या आहेत. त्यात अजितदादा गटाच्या दोन्ही जागा निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडीची त्यातही काँग्रेसची सात मते फुटल्याने महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. ही सातही मते जितदादा गटाला गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजितदादा ही मते फोडण्यात यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याला आज खुद्द अजित पवार यांनीच पुष्टीही दिली आहे. अजितदादा यांनी ही मते कशी फोडली? त्यांना कसं यश मिळालं? याची चर्चा आता रंगली आहे. मात्र, अजितदादांनीच हे गुपित सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी हे गुपित उघड केलं. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मी आमदारांना कोणतेही प्रलोभन दिलेलं नाही. फक्त आमदारांसमोर नमस्कार केला. अधिकची मते मला मिळाली. कारण माझे अनेक आमदारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी आमच्या उमेदवाराला मतदान केलं, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
माझं तुमच्यावर लक्ष असेल
आमदार मतदानासाठी आले. मी फक्त त्यांना नमस्कार केला. माझं लक्ष तुमच्यावर असेल एवढंच मी त्यांना म्हणालो, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं. या लोकसभा निवडणुकित पैशांचा वापर कुणी केला हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. आमच्या पक्षात एकतर्फी निर्णय कोणी घेत नसत. आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेतो. आमचा 12 जणांची पार्लमेंट्री बोर्ड आहे. त्यात निर्णय घेतला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
त्या आमदारांची नियुक्ती होणार
आगामी राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये मुस्लिम समाजाला संधी देण्यात येणार आहे. मुस्लिम समाजावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाहीं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी 12 आमदारांची नियुक्ती करण्याबाबत राज्यपालांना आम्ही शिफारस करणार आहोत. या आमदारांच्या निवडीनंतरच सभापतीपदाची निवड होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
भाजपची मते मिळाली
महायुतीत राष्ट्रवादीला भाजपची मतं मिळतं नाहीत यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली. त्यामुळें मतं ट्रान्स्फर होतं नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत देखील अशीच परिस्थिती असेल, असंही ते म्हणाले.
सहा मते बाहेरून आणली
दरम्यान, अजितदादा गटाचे नेते, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनीही विधान परिषद निवडणुकीवर भाष्य केलं आहे. विधान परिषद निवडणुकीत अजितदादा यांनी सहा मते बाहेरून आणली आणि विजय मिळवला आहे, असं धर्मराव बाबा म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 200च्यावर जागा येतील असं सांगतानाच अजितदादा तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. हे स्वप्न आहे. दादा महायुतीतच लढतील. आमची महायुती सक्षम आहे. आम्ही निवडणूक जिंकू, असं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.
288 जागांचा सर्वे करणार
दरम्यान, अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही मीडियाशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 288 जागांचा सर्व्हे करणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या. त्या जागांवर आमचा दावा असेल. यासोबतच इतर जागांचा देखील आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेण्यात येणार आहे. या जागांमध्ये नवाब मलिक यांच्या मतदारसंघाचा देखील समावेश असेल. सर्वेमध्ये 288 जागांमध्ये ज्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा सांगण्यात येणार आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली.