उद्धव ठाकरे यांच्या उमदेवारांविरोधात अजितदादा गटाचे उमेदवार ? अजितदादा यांचं सूचक विधान काय?
अजितदादा गटाचं कर्जत येथे गेल्या दोन दिवसांपासून अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनाला संबोधित करताना अनेक महत्त्वाचे गौप्यस्फोट केले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या धरसोड वृत्तीवर थेट भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी फुटीच्या पूर्वी नेमकं काय झालं होतं? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कर्जत | 1 डिसेंबर 2023 : अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचं कर्जत येथे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. घरी गेल्यावर लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आपल्याला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील चार लोकसभा मतदारसंघात जीवाचं रान करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या चार मतदारसंघापैकी एक मतदारसंघ खासदार सुप्रिया सुळे यांचा असल्याने अजितदादांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला अजेंडाच समोर मांडला. भविष्यात काय करणार आहे याची माहितीही त्यांनी दिली. लोकसभेच्या ज्या जागा भाजपकडे नाहीत आणि शिंदे गटाकडेही नाहीत त्या आम्ही लढवणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याकडे त्या जागा आहे. त्या आम्हाला लढवायच्या आहेत. त्यासाठी एनडीएशी चर्चा करण्यात येणार आहे. महायुती म्हणून सर्वांशी चर्चा करूनच आम्ही पुढे जाऊ, असं अजित पवार म्हणाले.
तो माझा अधिकार
आम्ही चार ठिकाणी उमदेवार दिल्यावर इतर लोक काय करणार हे मी काय सांगू? आम्ही चार ठिकाणी उमदेवार देणार. ते निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू. सातारा, शिरुर, बारामती, रायगड या चार ठिकाणी आम्ही उमदेवार देणार आहोत. या ठिकाणी कोणते उमेदवार द्यायचे हा माझा अधिकार आहे. कोण उमेदवार असतील हे योग्यवेळी सांगेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग न्यूज देणार नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याची बातमी आली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी ती बातमी वाचली. आम्ही जागा वाटप सामोपचाराने करू. तिघे बसून निर्णय घेऊ. तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग न्यूज देणार नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
शिवसेना कोण होती?
भाजपची विचारधारा वेगळी आहे असं सांगितलं जातं. आम्हाला शिवसेनेसोबत नेलं. शिवसेना कोण होती? 2014ला आम्ही सर्व बसलो होतो. वरिष्ठांना विचारून प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं. विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही तटस्थ राहिलो. तटस्थ राहणं म्हणजे एकप्रकारची मदतच होती, असं सांगत भाजपसोबत जाण्याचं अजित पवार यांनी समर्थन केलं