अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन, छापेमारीचा तीव्र निषेध
पुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी काऊन्सिल हॉलसमोर मानवी साखळी तयार केलीय. (Agitation of NCP workers in Pune in support of Ajit Pawar)
पुण्यातील काऊन्सिल हॉलसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय. अजित पवार यांचा शुक्रवारी पुणे दौरा असतो. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
हिमालयापुढे सह्याद्री कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही. अजित पवार यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु आहे. जनताच आता भाजपला प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप आणि रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिलीय.
‘मला ईडीची नोटीस दिली, लोकांनी भाजपला येडी ठरवली’
अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात चांगलीच टोलेबाजी केली. “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल”, असं शरद पवार म्हणाले.
पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय? दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
1 हजार 50 कोटी रुपयांचे व्यवहार
आयकर विभागानं महाराष्ट्रात एक ऑपरेशन राबवलंय ज्याची सुरुवात 23-9-2021 रोजी झाली होती. ह्या ऑपरेशनमध्ये एक सिंडीकेट उघड झालं असून, त्यात काही बिजनेसमन, दलाल तसच लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत यातली माहिती हाती लागत गेलीय. जवळपास 25 निवासस्थानं, 15 कार्यालयांची झडती घेण्यात आलीय. तर 4 ऑफिसची रेकी करण्यात आली. मुंबईतल्या प्रसिद्ध अशा ओबेरॉय हॉटेलमधल्या दोन सुटसचीही झडती घेण्यात आली. हे दोन्ही सुटस् दलालांनी त्यांच्या क्लायंटसना भेटण्यासाठी कायमस्वरुपी बूक केले होते. ह्या सिंडीकेटमध्ये जे दलाल, बिजनसमन, लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी व्यवहार करताना कोड नेमचा वापर केलेला आहे. यातले काही रेकॉर्ड हे 10 वर्षापूर्वीचे आहेत. हे सर्व व्यवहार हे 1 हजार 50 कोटी रुपयांचे आहेत.
इतर बातम्या :
अजित पवार खोटं बोलतात, जरंडेश्वर सारख कारखाना व्यवहारावरुन शालिनी पाटलांचा घणाघात
Agitation of NCP workers in Pune in support of Ajit Pawar