विधिमंडळात ते विधान कुणाला चुकीच वाटलं नाही, पण ‘या’मुळे आक्षेप घेण्यात आला; अजित पवार यांनी त्या विधानामागची कहाणी सांगितली…
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबात केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला. त्यावर अजितदादांनी आपली भूमिका मांडली आहे.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला. भाजपने अजित पवार यांच्याविरोधात आंदोलनं केली. अजित पवार यांच्या या विधानाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर अजित पवार (Ajit pawar) यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.
मी चुकीचं विधान केलेलं नाही. मी जे बोललो त्यात काहीही चुकीचं नाही, असं अजित पवार म्हणालेत.
मी कधीच महापुरुष यांच्याबद्दल चुकीचं बोललो नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करायचा भाजपला अधिकार नाही. मी चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माझ्याविरोधात बोलण्याचा आणि आंदोलनं करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अजित पवार म्हणालेत.
जेव्हा मी विधिमंडळात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत बोललो. तेव्हा कुणीही आक्षेप घेतला. कारण त्यावेळी सगळं घडवून आणणारा त्यांचा मास्टर माईड तिथं नव्हता. त्यामुळे तिथं आक्षेप घेण्यात आला नाही. नंतर मात्र त्यावर आक्षेप घेतला गेला.नंतर आंदोलनं केली गेली, असं अजितदादांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याचं रक्षण केलं. स्वराज्यमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. त्याचं रक्षण संभाजी महाराज यांनी केले आहे. त्यामुळे स्वराज्य रक्षक म्हणालो त्यात मी अपशब्द वापरला नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
मी माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, माझ्या वाचनात जे आले ते मी सांगितले आहे, मी काही इतिहास संशोधक नाही, मला युक्तिवाद करायचा नाही, इतिहास अभ्यासक यांचा हा विषय आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
जे माझ्या विरोधात आंदोलनात करतात त्यांनी राज्यपाल आणि भाजप मंत्र्यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असंही ते म्हणालेत.