‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, पत्रकार परिषद घेत अजित पवारांकडून सरकारवर हल्लाबोल
अजित पवार यांच्याकडून सरकारवर शाब्दिक हल्ला...
मुंबई : ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ (Fracture Freedom) पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय. सर्वच क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. साहित्य क्षेत्रातही सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. सरकारने अशी ढवळाढवळ करू नये, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.
कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केला. या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार अचानकपणे रद्द केला.त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. आज अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत निषेध केलाय.
‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकासाठी जाहीर झालेला पुरस्कार रद्द करून सरकार अघोषित आणीबाणी तयार करत आहे, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिंदे सरकार कसं सत्तेत आलं हे आपण सगळेच जाणतो. हे सरकार सत्तेत आल्यापासून रोज नवा वाद होतो आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला. त्या राज्यात जाहीर झालेला पुरस्कार परत घेतला. हे आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही. त्यामुळे मी या घटनेचा निषेध करतो, असं अजित पवार म्हणालेत.
पुरस्कार परत घेण्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.