मुंबई (Mumbai) : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतल्या घरावर झालेल्या हल्ल्याची चौकशी आता सुरु झालीय. पण ज्या काही महत्वाच्या गोष्टी समोर येतायत त्यात प्रमुख आहे ते मुंबई पोलीसांचं अपयश (Mumbai Police). एस.टी. आंदोलक हे पवारांच्या घराकडे चाल करुन गेले, ते मीडियाला कळालं पण मुंबई पोलीसांना कसं काय नाही असा सवाल आता विचारला जातोय. ह्या घटनेनंतर सोशल मीडियावर हा सवाल आलाच होता पण प्रमुख मंत्र्यांनीही यावर बोट ठेवलंय. विशेष म्हणजे गृहमंत्रालय हे राष्ट्रवादीकडेच (NCP) आहे आणि दिलीप वळसे पाटील गृहमंत्री आहेत. असं असतानाही थेट पवारांच्या घरावर एस.टी. आंदोलक चाल करुन गेले आणि ना गृहमंत्र्यांना, ना पोलीसांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही याचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बरं हे आश्चर्य दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच व्यक्त केलंय. काँग्रेस-शिवसेनेकडे गृहमंत्रालय असतं आणि असा हल्ला झाला असता तर आघाडीत आता काय स्थिती असती याची चर्चा न केलेलीच बरी.
अजित पवार आज विविधी कामांसाठी पुण्यात आहेत. सकाळी औंधमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले- पण ह्याच्यामध्ये माझं स्पष्ट मतंय, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचं काम त्यांचं असतं. त्यामध्ये ही लोकं कुठं तरी कमी पडली हे निर्विवाद सत्यय. कारण ती लोकं जेव्हा तिथं आलेली होती, त्यांच्यामागे मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मीडियाचे कॅमेरे येतात म्हणजे मीडिया बरोबर माहिती घेतं, मीडियाचं पण ते काम आहे, कुठं काय चाललंय ते अॅक्युरेटपणे दाखवायचा प्रयत्न करायचा. मग हे जर मीडियानं शोधून काढलं तर पोलीस विभागाच्या संबंधीत यंत्रणेला का नाही शोधून काढता आलं. त्याबद्दल एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशी करायला सांगितलं आहे.
गृहमंत्रालय हे सर्वात महत्वाचं मानलं जातं. आघाडी सरकारमध्ये तर गृहमंत्रालय सर्व वादांच्या केंद्रस्थानी आलंय. मग त्यात सचिन वाझेंचं अँटेलिया प्रकरण असो की, अनिल देशमुखांना गंभीर आरोपानंतर घरी जावं लागलं ते प्रकरण असो की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांचे शंभर कोटीचे आरोप असो. असा एकही दिवस, आठवडा नाही की गृहमंत्रालय चर्चेत नाही. त्यातही मुंबई पोलीस. आता तर खुद्द शरद पवारांच्याच घरावर एस.टी.आंदोलक चाल करुन गेले आणि त्याचा पत्ताही पोलीसांना लागला नाही. त्यावर खुद्द राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी बोट ठेवलंय. मग तटकरे असोत की मुंडे आणि आता तर खुद्द अजित पवार. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी बोट ठेवल्यामुळे अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी अडचण झालीय. चौकशी अंती बळी पोलीसांचा दिला जाईल पण गृहमंत्रालयाच्या राजकीय नेतृत्वावरही सोशल मीडिया सवाल करु लागलाय.