ज्यांनी घोटाळ्याचा आरोप केला, त्यांना मंत्री बनवलं, अजित पवारांचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर हल्लाबोल केला. 13 मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेतले, पण 6 मंत्र्यांना का वगळले हे सभागृहाला कळले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर हल्लाबोल केला. 13 मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेतले, पण 6 मंत्र्यांना का वगळले हे सभागृहाला कळले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. इतकंच नाही तर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही निशाणा साधला.
मंत्र्याची खाती बदलून सगळा आनंदी आनंद. जे सध्या गृहनिर्माण मंत्री झाले आहेत (राधाकृष्ण विखे पाटील) त्यांनी सध्याच्या गृहमंत्र्यांवर 1 लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात 10 हजार कोटी पोहोचले असा आरोप विखेंनी केला होता, त्याचे काय झाले? जे आरोप करतो त्याला मंत्री केले. त्यामुळे त्यावेळी बोलले ते खोटे होते की खरे होते ते कळले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, 16 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) बहुप्रतीक्षीत विस्तार पार पडला. यामध्ये काँग्रेसमधून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्र वादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
या मंत्रिमंडळातून विद्यमान 6 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यातील बडं नाव म्हणजे तत्कालिन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं होतं. प्रकाश मेहतांवर गृहनिर्माण प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप होता. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याची चर्चा आहे. प्रकाश मेहतांवर मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळ्याचा आरोप आहे. बिल्डरला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप आहे. तोच धागा पकडून अजित पवारांनी आज सरकारवर निशाणा साधला.
संबंधित बातम्या
राज्य मंत्रिमंडळ विस्तार : खातेवाटपही जाहीर, पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?
राज्य मंत्रिमंडळ विस्तार : 13 जणांचा शपथविधी, सहा जणांना डच्चू