NCP Ministers Meet Sharad pawar : सुप्रिया सुळे यांचा फोन आला, चव्हाण सेंटरला या, काय घडतंय माहीत नाही, जयंत पाटील यांचं विधान; पवारांची पुढची खेळी कोणती?
राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली होती. तर शरद पवार यांनी आपण भाजप सोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 16 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री थोड्याच वेळापूर्वी शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड तातडीने आले आहेत. त्यामुळे या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे चव्हाण सेंटरमध्येच असल्याने त्यांच्या भेटीला हे नेते गेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा एक गट हा शरद पवार यांच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पवार विनंती मान्य करणार?
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वपदी कायम राहावं आणि सरकारमध्ये सहभागी व्हावं म्हणून शरद पवार यांना या मंत्र्यांकडून विनंती केली जावू शकते. शरद पवार ही विनंती मान्य करतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळेही या भेटीला महत्त्व आलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, मला फोन आला
दरम्यान, या घडामोडींवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला. त्यांनी चव्हाण सेंटरला यायला सांगितलं. त्यामुळे मी तिकडे जात आहे. तिकडे कोण आलंय, काय घडामोडी सुरू आहेत, हे मला माहीत नाही, असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्यापाठोपाठ जितेंद्र आव्हाडही वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून या नेत्यांची बैठक सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होते. काय स्टॅटेजी ठरवली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भुवया उंचवल्या
राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली होती. तर शरद पवार यांनी आपण भाजप सोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दोन्ही गट वेगवेगळे झालेले असतानाच अवघ्या 15 दिवसातच राष्ट्रवादीचे नेते हे शरद पवार यांना भेटायला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.