आमदार भरणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अजित पवारांचा मिश्किल टोमणा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील किंवा आमदार दत्तात्रय भरणे यापैकी ज्याला तिकिट मिळणार नाही तो एक नेता भाजपमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा होत आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील किंवा आमदार दत्तात्रय भरणे यापैकी ज्याला तिकिट मिळणार नाही तो एक नेता भाजपमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा होत आहे. अशातच आज माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी चक्क आमदार दत्तात्रय भरणे यांनाच मिश्किलपणे टोमणा मारला. इंदापूरचे लाडके आमदार दत्तात्रय भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्यावतीनं स्वागत असं म्हणतानाच अजित पवारांनी भरणे यांना हे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ असंच टिकावं ही सूचक अपेक्षा व्यक्त केली. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते बारामतीतील एका रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला इंदापूर तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळाले होते. आता विधानसभा तोंडावर आलेल्या असताना इंदापूरमधून कुणाला संधी मिळणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. या मतदारसंघासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यातच उमेदवारीसाठी प्रमुख स्पर्धा आहे. भविष्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज घेऊनच अजित पवारांनी आमदार भरणेंना हा टोमणा मारल्याची चर्चा आता यानिमित्ताने रंगू लागली आहे.
‘शरद पवारांची काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये सहकार्य करण्याची ग्वाही’
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याची तक्रार करत आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याची भूमिका घेतली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे साहजिकच आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास भरणे भाजपमध्ये जातील असा अंदाज बांधला जातो आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हेही भाजपमध्ये जाणार असल्याच्या राजकीय वावड्या उठवल्या जात आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी काहीही झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीलाच राहील असं वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मवाळ भूमिका घेत जाहीरपणे आघाडी धर्म पाळण्याची ग्वाही दिली. त्यामुळेच आता राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना संधी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. परिणामी आज अजित पवार यांनी सूचक वक्तव्य करत भरणे यांना राष्ट्रवादीतच राहण्याबाबत गळ घातल्याची चर्चा होत आहे.