Ajit Pawar : तुम्ही डान्सबार फोडले, पण तुमच्याच घराशेजारी सर्रासपणे डान्सबार सुरू; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Ajit Pawar : तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही एवढ्या लोकांना संधी दिली. 20 लोकांना संधी दिली. पण महिलांना स्थान दिले नाही. ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने महिलांचा अपमान व्हायला नको. आधी तुम्ही बोललात सरकारमध्ये सहभागी होणार नाही.
मुंबई: मी ठाण्यातील डान्सबार स्वत: फोडले. त्यामुळे मला गुंडांनी टार्गेट केलं होतं. पण आनंद दिघे (anand dighe) यांनी मला वाचवलं. बार डान्स फोडणारा मी पहिला नेता आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी म्हटलं होतं. शिंदे यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर सोळा डान्स बार फोडणारा मी आहे असे छातीठोक सांगितले. मात्र आता तुमच्या घराच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर डान्स बार (dance bar) सुरू आहेत. अनेक प्रसारमाध्यमांनी याची चित्रफीतही दाखवलेली आहे. आमच्या काळात डान्स बार बंद केले होते. मात्र आता सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला. तुम्ही दोघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे एकाच नाण्याची दोन बाजू झालेले आहात. कळतच नाही कुठलं नाणं आहे, असा चिमटाही अजित पवार यांनी काढला.
तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही एवढ्या लोकांना संधी दिली. 20 लोकांना संधी दिली. पण महिलांना स्थान दिले नाही. ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशा पद्धतीने महिलांचा अपमान व्हायला नको. आधी तुम्ही बोललात सरकारमध्ये सहभागी होणार नाही. आणि नंतर तुम्हाला सांगण्यात आलं उपमुख्यमंत्री व्हावे लागेल. जर तुम्ही दिल्लीला सांगितलं असतं की मी उपमुख्यमंत्री होतो, पण माझ्याबरोबर दोन महिलांना मंत्रिमंडळात संधी द्या तर दिल्लीवाल्यांनी दोन महिलांना मंत्री केलं असतं. एवढंच निश्चितच ऐकलं असतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
कुणीही ताम्रपट घालून आला नाही
मागच्या दीड दोन महिन्यांपूर्वी आम्ही सत्तेत होतो. तुम्ही म्हणाल अडीच वर्षे सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं? सरकार कुणाचेही असो कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. राज्यातल्या जनेतच्या सुरक्षेचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल यासाठी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. सत्ता आल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. त्यात दुमत नाही. देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले मी पुन्हा येईन नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
कशाची मस्ती आलीय?
सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात. कशाची मस्ती आलीय एवढी? दुसऱ्या एका आमदाराने अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली. कायदा सामना आहे हे मला सांगण्यापेक्षा मागेही सांगावं लागत. आमदारांचं हे वागणं चुकीचं आहे. त्यामुळे सर्वच आमदार असे वागतात की काय असा मेसेज जातो, असं ते म्हणाले.
सायबर सेलमध्ये भरती करा
तज्ज्ञ मुलांना सायबर सेलमध्ये भरती केले पाहिजे. टीईटी घोटाळ्याची भर पडली आणि वेगवेगळ्या लोकांची नावे समोर आलीत. याबाबत विचार झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.