वाढदिवस तुमचा व्हायचा आणि वाट आमची लागायची : अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाषणाची एक खास शैली आहे. आपल्या रांगडी भाषणातून ते कार्यकर्त्यांना कानपिचक्या तर देतातच पण उपस्थितांनाही खळखळून हसायला भाग पाडतात.
बारामती, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाषणाची एक खास शैली आहे. आपल्या रांगडी भाषणातून ते कार्यकर्त्यांना कानपिचक्या तर देतातच पण उपस्थितांनाही खळखळून हसायला भाग पाडतात. बारामतीत काल झालेल्या विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्यातल्या विनोदी शैलीचा अनुभव बारामतीकरांना आला. विविध किस्से आणि प्रसंग सांगत त्यांनी उपस्थितांना खळखळून हसवलं.
बारामतीतील डॉ. पवार हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सर्वप्रथम आपला आणि पवार हॉस्पिटलचा काहीही संबंध नाही, असं सांगितलं. तुम्ही सकाळी याल आणि इथे मोफत उपचार करून द्या म्हणून सांगाल, असं काहीही नाही, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पोल्ट्रीचही काम केल्याचं सांगताना त्यांनी आपण स्वतःदेखील पोल्ट्रीत काम केल्याची आठवण सांगितली.
वाढदिवसावरुन टोमणा
“मी घरी एक खुर्ची रिकामीच ठेवत असतो. एखादा कार्यकर्ता येतो वाढदिवस आहे सांगतो, मग त्याला शेजारीच बसवून फोटो काढून देतो. फक्त त्याचा व्यवसाय चांगला असायला हवा. नाहीतर दारू, मटक्याचा धंदा करणारा असायचा आणि आमची वाट लागायची. वाढदिवस यांचा आणि पंचनामा आमचा” असं व्हायला नको असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचा किस्सा सांगत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
अजित पवार हे नेहमीच विनोदी शैलीत भाषण करतात. विशेषतः ग्रामीण भागात आल्यावर त्यात अधिक मजेशीर किस्से अनुभवयाला मिळतात. कालही अजित पवारांनी अनेक किस्से सांगत उपस्थितांची दाद मिळवली.
वाढदिवस तुमचा व्हायचा आणि वाट आमची लागायची : अजित पवारhttps://t.co/iFuVj5klmT pic.twitter.com/72c9DLgopK
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2019