आर आर पाटलांनी हातात हात घेतला अन् म्हणाले, दादा तुझं ऐकलं…; अजितदादांनी सांगितलेला किस्सा काय?
अजितदादांनी प्रत्येकाला सकस आहार घेण्याचा सल्ला दिला. वेळेवर उठा. व्यायाम करा. सकस आहार घ्या आणि आजारी पडला तर डॉक्टरांकडे जा, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
मावळ: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मावळमधील नागरिकांना पान, तंबाखू आणि गुटख्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर आर पाटील यांचा किस्साही ऐकवला. मी कडक बोलतो असं म्हटलं जातं. पण मी जेव्हा आबांना भेटायला रुग्णालयात गेलो. तेव्हा त्यांनी माझा हातात हात घेतला. अन् म्हणाले, दादा, मी तुझं ऐकलं असतं तर ज तुमच्यात राहिलो असतो, अजित पवार यांनी भर सभेत हा किस्सा ऐकवला. त्यावेळी अनेकांची मन हेलावून गेली.
अजित पवार मावळमध्ये आले होते. येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी थेट डॉक्टरांच्या आवेशातच सर्वांना धुम्रपानापासून दूर राहण्याचा कळकळीचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी आर आर आबांचा किस्साही ऐकवला. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिद्दीने कशी आजारावर मात केली याची माहिती देत पवारांचं कौतुकही केलं.
आपला देश मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होत आहे. आपल्याला योगा शिकवण्यासाठी परदेशातून व्यक्ती येत असतात. कधी कधी एखादा गरीब व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी जातो तेव्हा त्याची किडनी काढली जाते. कोणी जर जीवाशी खेळत असेल तर मला वाटतं अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
दुसऱ्या कोणत्या शिक्षेने फरक पडणार नाही. त्यामुळे कडकच शिक्षा दिली पाहिजे, असं सांगतानाच गुटखा, पान, तंबाखूपासून दूर राहा. ही व्यसनं करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
शरद पवार यांनी कँन्सरवर मात केली होती. त्याचं त्यांनी कौतुक केलं. 2004 साल मला आठवतंय. मला सभेत सांगण्यात आलं निवडणुकीचा फॉर्म भरलाय. पम सेनापती नाहीये. लढाई तुम्हाला जिंकायची आहे. त्यावेळी साहेब ब्रीच कँडीला भरती झाले होते. कँन्सर झाला तर लोक घाबरून जातात. पण पवार साहेब घाबरले नाहीत. त्यांनी कँन्सरवर जिद्दीने मात केली, असं त्यांनी सांगितलं.
प्रत्येकाने आयुष्यात काही पथ्यं पाळली पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. समाजाला निरोगी ठेवलं पाहिजे. आपला आहार,विहार आणि चांगले विचार ठेवले पाहिजे. माझ्यासमोर जाड आणि स्थूल माणूस आला की त्याला सांगत असतो, बाबा रे जरा कमी हो. मी एका चांगल्या भावनेने सांगत असतो, असं त्यांनी सांगितलं.
आपलं आपल्या जीभेवर कंट्रोल असलं पाहिजे. काही लोकांचं तर असं असतं की डोक्यातून घाम निघेपर्यंत त्यांचं जेवायचं थांबत नाही. शेतकरीही पिकांवर औषधांची प्रचंड फवारणी करतात. त्यामुळे ते धान्य खाण्यात आल्यावर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
शेतकरी औषध मारायला जातो आणि काळजी नाही घेतली तर वासाने मरतो. जनावरांनाही जीव गमवावा लागतो. समुद्रात एवढं प्लास्टिक वाढलं की मासेही ते खातात. त्यामुळे मासे खाल्ल्यावर अपाय होतो, असं त्यांनी सांगितलं.
अजितदादांनी प्रत्येकाला सकस आहार घेण्याचा सल्ला दिला. वेळेवर उठा. व्यायाम करा. सकस आहार घ्या आणि आजारी पडला तर डॉक्टरांकडे जा, असा कानमंत्रही त्यांनी दिला.