राजकारणाचा नेम नाही! ज्यांचं धोतर फेडण्याची भाषा, त्यांच्यासाठीच अजितदादांची फिल्डिंग; भाजप नेते म्हणतात, आता धोतर नेसवायला येताय का?
सीताराम गायकर यांच्यासाठी अजितदादाच फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत! अजितदादा 15 जुलैला अहमदनगरच्या अकोले तालुक्यात येत आहेत. तिथे ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात ते अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गायकर यांचा प्रचार करणार आहेत.
अहमदनगर : राजकारण आणि राजकारण्यांचा काही नेम नसतो असं म्हणतात. हे वारंवार सिद्धही होत आलंय. याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर आताच पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावं लागलं. तर एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री बनले! अहमदनगरमध्येही असंच एक चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांचं धोतक फेडण्याची भाषा केली होती. त्याच सीताराम गायकर (Sitaram Gaikar) यांच्यासाठी अजितदादाच फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत! अजितदादा 15 जुलैला अहमदनगरच्या अकोले तालुक्यात येत आहेत. तिथे ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात ते अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गायकर यांचा प्रचार करणार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव विचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजितदादांनी अकोले दौऱ्यावर असताना पिचड पिता-पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला होता. तसंच सीताराम गायकर यांचं धोतर फेडण्याची भाषाही त्यांनी केली होती. ‘पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका’, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. त्यावेळी विधानसभेला राष्ट्रवादीला निवडून द्या, त्यांचं ( सीताराम गायकर ) यांचं धोतर फेडू, असं म्हणत अजित पवारांनी पिचडांचे तेव्हाचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला होता.
गायकरांच्या प्रचारासाठी अजितदादा उद्या अकोलेत!
आता अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होतेय. या निवडणुकीत पिचड पिता पुत्रांविरोधात सीताराम गायकर यांनी दंड थोपटलेत. त्यामुळे गायकर यांच्या प्रचारासाठी अजितदादा अकोले इथं येत आहेत. उद्या सकाळी 11 वाजता गायकर यांच्या प्रचारासाठी अजितदादांची जाहीर सभा होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पिचड पिता पुत्रांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर गायकरही त्यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे अजित पवार यांनी गायकर यांच्यावर जोरदार टीका केली होती.
अजितदादा गायकरांना धोतर नेसवायला येत आहेत का?
अजित पवार यांच्या प्रचारसभेपूर्वी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी अजितदादांना टोला लगावलाय. विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी सीताराम गायकर यांचं धोतर फेडण्याची भाषा केली होती. तेच अजित पवार आता धोतर नेसवण्यासाठी येणार आहेत का? असा खोचक सवाल भांगरे यांनी केलाय.