शपथविधीचा मुद्दा पेटला अन् अजित पवार खासगी भेटी-गाठीत बिझी, काय घडतंय?
पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
संतोष जाधव, उस्मानाबादः राज्यभरात विधान परिषद निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. त्यातच जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्यावरून अजित पवार (Ajit Pawar)- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्याला हवा मिळाली आहे. हा शपथविधी म्हणजे राष्ट्रवादीची, विशेषतः शरद पवार यांची जाणून-बुजून केलेली खेळी होती का, असा सवाल उपस्थित होतोय. यावरून फडणवीस आणि अजित पवारांकडून थेट उत्तर येण्याची सर्वांना अपेक्षा आहे. मात्र अजित पवार थोड्या वेगळ्याच कामात बिझी आहेत. उस्मानाबादेत अजित पवार आज खाजगी कामात बिझी असल्याचं दिसून आलं. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार सध्या मराठवाड्यात आहेत. उस्मानाबादमध्ये आज पहाटेच अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांनी साखर कारखान्याला भेट दिली.
पहाटेच कोणता दौरा?
विधानपरिषद मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र खासगी दौऱ्यावर दिसून आले. अजित पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना व भूम येथील बाणगंगा – आयान साखर कारखान्याची अचानक पाहणी केली.
राष्ट्रवादीचे भुम परंडा मतदार संघांचे माजी आमदार राहूल मोटे यांचा बाणगंगा साखर कारखाना आहे. तर उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा आहे.
पवार यांचा साखर कारखाना दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांना कार्यकर्ते यांना याची कल्पना देण्यात आली नव्हती. अजित पवार हे असे अचानक पाहणी दौरे करतात. त्यामुळे या दौऱ्याचीही चर्चा सुरु झाली आहे. इकडे राजकारण तापलं असताना अजित पवार ‘साखर पेरणी’त बिझी असल्याची चर्चा आहे.
साखर कारखानदारीला प्राधान्य..
अजित पवार यांनी त्यांच्या ताब्यातील कारखाने यांचा आढावा घेतला. भल्या पहाटे 6 वाजता उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याची पाहणी केली व तिथल्या कारभाराचा आढावा घेतला. साखर कारखानदारी आणि त्यातून राजकारण व सत्ता हे गणित जुने असुन पवार नेहमी याला प्राधान्य देतात हे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शपथविधीवर बोलणं टाळतायत?
पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. प्रजासत्ताक दिनाला देवेंद्र फडणवीस यांनीही यावर बोलणं टाळलं. तर अजित पवार यांनीही काल मजेशीर उत्तर दिलं. बेरोजगारी, महागाई यासारख्या विषयांना टाळण्यासाठी या चर्चा सुरु झाल्याचं ते म्हणाले. एकूणच सध्या तरी फडणवीस आणि अजित पवार यावर स्पष्ट बोलण्याची शक्यता कमीच वर्तवली जात आहे.