सातारा : राज्यात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत आहे. अशावेळी राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केलाय. यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरुन अजित पवार चांगलेच संतापले. पीएम केअरकडून आलेले अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण असे व्हेंटिलेटर दुरुस्त करुन घ्यावे लागत आहेत. अशा काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. (Ajit Pawar was Angry over the issue of faulty ventilator )
राज्यातील 18 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा जास्त आहे. आपण फक्त परिस्थितीचा आढावा घेतला नाही तर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. जिथे कर्मचारी कमी आहेत, तिथे कर्मचारी दिले. 7 रुग्णवाहिका उद्या साताऱ्यासाठी येतील. लसीकरणासाठी दादागिरीच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत पोलिसांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशा शब्दात अजितदादांनी दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिलाय. तसंच जिल्ह्यात अजून काही ठिकाणी जम्बो कोविड हॉस्पिटल सुरु करण्याच्या सूचना दिल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
साताऱ्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी प्रशासनाकडून काही कठोर पावलं उचलली जातील. त्यामुळे सातारकरांनी वाईट वाटून घेऊ नये. कारवाईची वेळ नागरिकांनी आणू नये. जे अधिकारी, प्रशासनातील लोक सूचनांचं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही अजितदादांनी दिलाय. त्याचबरोबर राज्यात आता रेमडेसिव्हीरचा तुटवडा राहिला नाही. पण म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन कमी पडत असल्याचं अजितदादा म्हणाले. तसंच रुग्णालयातील ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. अशावेळी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य सरकार भर देत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत 442 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं.
राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात 442 रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका राज्याच्या आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी 12, सातारा जिल्ह्यासाठी 13, सोलापूरसाठी 9, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 13 आणि सांगली जिल्ह्यासाठी 9 रुग्णवाहिकांचे आज वितरण करण्यात आलं. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या. ह्या रुग्णवाहिकांचं आज लोकार्पण करण्यात आलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. pic.twitter.com/mD3nZN6ckt
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 28, 2021
संबंधित बातम्या :
केंद्राकडून मिळालेले व्हेंटिलेटर फडणवीस, पाटलांनी चालू करुन दाखवावे, काँग्रेसचं आव्हान
Ajit Pawar was Angry over the issue of faulty ventilator