Ajit Pawar : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला अजित पवार गैरहजर राहणार? जयंत पाटील यांचं सूचक विधान
या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होतोय. भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेच्या राजन साळवी यांच्यात लढत होतेय. यासाठी आता एक एक मत महत्त्वाचं असल्यामुळे अजित पवार हे अधिवेशनाला येतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला हजर राहणार की गैरहजर राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत सूचक विधान केलं. टीव्ही 9 मराठीशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. अजित पवार यांना कोरोनाची (Ajit Pawar Corona)लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वतःला होम आयसोलेट करुन घेतलंय. प्रकृतीच्या कारणास्तव ते येण्याची शक्यता कमी असल्याचं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलंय. त्यामुळे आजच्या विशेष अधिवेशनाला अजित पवार उपस्थित राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होतोय. भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेच्या राजन साळवी यांच्यात लढत होतेय. यासाठी आता एक एक मत महत्त्वाचं असल्यामुळे अजित पवार हे अधिवेशनाला येतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
आणखी काय म्हणाले जयंत पाटील?
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पक्षाचा व्हीप पाळावाच लागतो, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. विरोधात मतदान केल्यास कारवाई होऊ शकते, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली. जर शिवसेनेनेच्या बंडखोर आमदारांनी आम्हाला मतदान केलं तरचं आमचा विजय होऊ शकतो, असंही ते म्हणाले. सद्सद्विवेक बुद्धीने पक्षविरोधी मतदान करायचं नसतं, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानभवनात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आज विधानसभेचा अध्यक्ष ठरणार!
विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. हे विशेष अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदे यांना आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय. आज आणि उद्या असे दोन दिवस हे अधिवेशन पार पडेल. दरम्यान, त्याआधीच शिवसेनेनं शिंदेंवर पक्षविरोधी कामं केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र अजून पक्षातून त्यांना काढून टाकण्यात आलेलं नाही. एकनाथ शिंदे यांना एकीकडे गटनेते पदावरुन हटवल्यानंतर त्यांची शिवसेनेच्या नेतपदावरुनही हकालपट्टी करण्यात आलीये. तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीये.