अहमदनगर : नगर जिल्ह्यातील अकोले दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड पिता – पुत्रांना दिला.
अजित पवार यांचं पिचडांवर टीकास्त्र
“भाजपसारख्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एकविचाराचे सर्व एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीतून राजे गेले, सेनापती गेले, नेतेही गेले. पण शरद पवार ठामपणे काम करत आहेत. १९९५-१९९९ मध्ये युतीचं सरकार तेव्हा पिचडांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. मंत्रिपदे दिली, जि.प. अनेक पदे अकोलेत यांनाच दिली. तरीही पिचड गेले, मोठं पाप पिचडांनी केलं आहे. एकास एक उमेदवार देण्याच्या निर्णयावर ठाम राहा. आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांना दमबाजी करु नका”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. विधानसभेला राष्ट्रवादीला निवडून द्या, त्यांचं ( सीताराम गायकर ) यांचं धोतर फेडू, असं म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला.
भाजपवर हल्लाबोल
आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आले. पण कोणतंही आश्वासन पूर्ण केली नाहीत. गड किल्यात आता छमछम सुरू करणार. आम्ही बंद केलेले डान्स बार यांनी सुरू केले, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
अकोलेचा गुलाल उधळेन
निवडून द्या, मी बारामतीऐवजी अकोलेचा गुलाल घेण्यासाठी येईन. मी अकोलेसाठी खूप दिलं. मी शब्दाचा पक्का आहे. पाच वर्षात 15 वर्षापेक्षा जास्त काम करुन दाखवेन, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, जि. प सदस्या सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर आता पिचडांना शह देण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याची तयारी अकोलेतील विविध नेत्यांनी केली. यापूर्वी मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांचेविरोधात अशोक भांगरे नेहमीच लढत होते. मात्र मतविभाजनामुळे पिचडांना नेहमीच फायदा झाला.
आता अकोलेतून डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, अशोक भांगरे हे तिघेही इच्छुक आहेत. मात्र आता राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याकडे अकोलेकरांचं लक्ष लागलं आहे.
युतीच्या गणितावर अकोले तालुक्यातील शिवसैनिक काय भूमिका घेतात हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या
…तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार
मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!