अजित पवार यांची महायुतीत प्रचंड मोठी कोंडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मलिकांवरून मोठं विधान
नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रोल झाले. त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या मुद्द्याला अधिकच हवा मिळाली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीस यांच्या सूरात सूर मिसळला आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 8 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असल्याने आम्ही त्यांच्यासोबत बसू शकत नसल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी तसं पत्रच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडालेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे अजित पवार यांची महायुतीतच मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून आपली भूमिका मांडली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्ही सहमत
आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहीत व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे, असं सांगतानाच जनहिताचा, लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील, अशी आशाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
नाकाने कांदे…
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनाही सुनावले आहे. विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही. नवाब मालिक तुरुंगात असताना ते महाविकास आघाडीत मंत्रीपदावर होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना या मुद्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मेहबुबा मुफ्ती कशा चालतात?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून मत व्यक्त केलं आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना महायुतीत घेऊ नये असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिलेलं आहे. देशद्रोहाचा आरोप असलेला व्यक्ती आपल्या सोबत नसावा, असं पत्रात म्हटलंय. फडणवीस यांची ही भूमिका दुटप्पी आहे. काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत युती करणं भाजपला कसं चालतं? काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत उघड उघड बंड करणारे भाजपवाल्यांना चालतात. मलिक चालत नाही. भाजप सोयीची भूमिका घेत आहे. मंत्रिमंडळातही भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेकजण आहेत. ते कसे चालतात? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.