अजितदादा आणि शिंदे गटात फोडाफोडीचे राजकारण? माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल
लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना (शिंदे गट) सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा यांनी शिंदे गटाला मोठा हादरा दिला.
लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना (शिंदे गट) सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा यांनी शिंदे गटाला मोठा हादरा दिला. शिंदे गटातील माजी आमदारांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कन्नड साखर कारखान्याचे माजी चेअरमन, कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघामध्ये ठाकरे गट विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजितदादा यांचे निवासस्थान देवगिरी येथे हा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशावेळी अजितदादा यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संकल्पनेतील महाराष्ट्र ज्यामध्ये चिरंतन प्रगती आणि स्थैर्य आहे. अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत आहे असे सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदार संघाचे नितीन पाटील हे माजी आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून मनसेचे हर्षवर्धन जाधव आणि ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत अशी लढत झाली होती. मात्र, आगामी निवडणुकीत शिंदे गटाचे नेते नितिन पाटील हे कन्नड मतदारसंघातील संभाव्य उमेदवार समजले जात होते. मात्र अचानक त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे, शिंदे गटामध्येही एक पक्षप्रवेश झाला. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही पक्षप्रवेश केला. नंदनवन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी कोरोना काळात पीएस फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.