मिटकरींना दवाखान्यात न्या, डोकं तपासून घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला
एकनाथ शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज आहेत. त्यापैकी काहीजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय.
अकोलाः एकनाथ शिंदेंच्या सेनेतले काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य करणाऱ्या अमोल मिटकरींना अब्दुल सत्तारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल मिटकरी असं म्हणत असतील तर आध त्यांना दवाखान्यात न्या. त्याचं डोकं तपासून घ्या, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिलाय. कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अकोल्यातील महाबीज बियाणे महामंडळाच्या भेटीदरम्यान, त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. कृषीमंत्री सत्तारांचा विदर्भ दौरा चांगलाच गाजतोय. या दौऱ्यातील त्यांची वक्तव्य आणि आश्वासनही सोशल मीडियात चर्चेत आहेत.
मिटकरीचं वक्तव्य काय?
एकनाथ शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज आहेत. त्यापैकी काहीजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय. मिटकरींच्या याआधीच्या वक्तव्यांचाही सत्तार यांनी खरपूस समाचार घेतला.
सत्तारांचा मिटकरींवर पलटवार
कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मात्र कृषीमंत्री रात्री बांधावर जाऊन पाहणी करतात, असा टोला मिटकरींनी लगावला होता. यावर पलटवार करताना अब्दुल सत्तार म्हणाले, कृषीमंत्री झाल्यावर पहि्या दोन महिन्यात एवढा फिरणारा मंत्री मिटकरींनी कधी पाहिला नसेल. त्यामुळेच अमोल मिटकरी आणि विरोधकांना पोटशूळ उठलंय.
मेळघाट दौऱ्याची चर्चा
अब्दुल सत्तार काल मेळघाटच्या दौऱ्यावर होते. अमरावती जिल्ह्यातल्या अति दुर्गम भागातील गाव साद्राबाडी येथे त्यांनी मुक्काम केला. गावातल्याच एका शेतकऱ्याच्या घरी रात्री ते राहिले. तिथली रानभाजी आणि भाकरी असा अगदी साधा पाहुणचार स्वीकारला. सत्तारांच्या या साधेपणाचं कौतुक सोशल मीडियावर होतंय. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही खूप व्हायरल होतायत.
मुक्काम केला तिथे दोन घरं
साद्राबाडी इथं ज्या सत्तारांनी जिथं मुक्काम केला. ते घर रात्री पावसाच्या पाण्यामुळे गळत होतं. त्याच वेळी कृषीमंत्र्यांनी या शेतकऱ्याला माझ्या पैशांतून घर बांधून देणार असल्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्या दिवशी या शेतकऱ्यासाठीच्या घराचं भूमीपूजनही करण्यात आलं. त्यामुळे सत्तारांच्या या दातृत्वाचाही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.