पृथ्वीबाबा विरुद्ध विलासकाका : कृष्णाकाठावर हाडवैराची सांगता !
पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर हे एकमेकांचे किती कट्टर वैरी होते, याची झलक 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याने पाहिली.
कराड (सातारा) : स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसची विचारधारा जपणारी दोन घराणी तब्बल साठ वर्षानंतर एकत्र आली आहेत. माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे एकमेकांचे हाडवैरी एकाच व्यासपीठावर दिसले. त्याचं निमित्त होतं, विलासकाकांचे सुपुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर ( Udaysinh Vilasrao Patil ) यांचा काँग्रेसमधील प्रवेश. (Prithviraj Chavan vs Vilaskaka Patil Undalkar )
पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर हे एकमेकांचे किती कट्टर वैरी होते, याची झलक 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याने पाहिली. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघात विलासकाका उंडाळकरांनी खिंडीत गाठलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांनी 2014 आणि 2019 मध्ये बाजी मारली असली तरी त्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना किती घाम गाळावा लागला हे महाराष्ट्राने पाहिलं.
कृष्णाकाठावर हाडवैराची सांगता
हेच हाडवैर आज संपलंय. कराडचा कृष्णाकाठ आज विलासकाका पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातलं वैर संपताना पाहतोय. गेल्या 6 दशकात काँग्रेसमध्येच राहून हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिले. मात्र, दोघांनीही वेगळ्या विचारधारेशी समझोता केला नाही. दोघेही काँग्रेसमध्येच राहिले.
विलासकाकांच्या सुपुत्राने पृथ्वीबाबांचं नेतृत्त्व स्वीकारलंय, मात्र त्याचवेळी विलासकाका आणि पृथ्वीबाबांचा वारस आपणच आहोत, असं म्हणत उदयसिंह पाटील उंडाळकरांनी आपला डाव टाकलाय. विलासकाका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय वारसदाराचे अप्रत्यक्ष लॉचिंग आज होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. तसं पाहता उदयसिंह पाटील यांना काँग्रेस काही नवी नाही. कारण उंडाळकर घराण्याने काँग्रेसची विचारधारा स्वातंत्र्यपूर्वकाळापासून जपली आहे. विलासकाका उंडाळकर हे सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतून महाराष्ट्रात आले आणि उंडाळकर-चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडली.
एक पक्ष, एक मतदारसंघ, उमेदवार दोन
पक्ष एक…मतदारसंघ एक…आणि उमेदवार दोन…याच पेचातून हे वैर सुरु झालं. पृथ्वीराज चव्हाणांचे आई आणि वडील दोघेही खासदार. त्यामुळं त्यांनाही खासदारकीची संधी आली.
त्यामुळंच नाराज होऊन विलास पाटील उंडाळकरांनी वेगळा गट तयार केला. आमदार म्हणून उंडाळकरांना मंत्रिपदासाठी संधी मिळाली आणि 7 टर्म म्हणजेच तब्बल 35 वर्ष उंडाळकरांचं कराड मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व राहिलं. तर पृथ्वीराज चव्हाण केंद्रात गेल्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही.पंतप्रधान कार्यालयात मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळं दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण तर कराडमध्ये विलासकाका उंडाळकर यांचं स्थान कायम राहिलं.
काँग्रेसने 2014 मध्ये विधानसभेचं तिकीट अर्थातच तत्कालीन मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालं. त्यामुळे 35 वर्ष गड सांभाळणारे विलासकाका संतापले आणि त्यांनी पृथ्वीबाबांना आव्हान दिलं. नाराज झालेल्या विलासकाकांनी अपक्ष उभं राहत पृथ्वीबाबांना कडवं आव्हान दिलं.
या निवडणुकीत पहिल्यापासून ग्राऊंडवर असलेल्या विलासकाकांना सुरुवातीला प्रचारात फायदा मिळाला. मात्र मुख्यमंत्रिपद सांभाळून प्रशासनावर छाप सोडणाऱ्या पृथ्वीबाबांनी हळूहळू कराडकरांना आपलंस केलं. पृथ्वीबाबांची प्रचंड दमछाक झाली, मात्र विजयी टिळाही त्यांनाच लागला. पृथ्वीराज चव्हाणांनी विलासकाका उंडाळकरांच्या 35 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. यानंतर दोन्ही घराण्यात वैराची साखळी आणखी पक्की झाली. 2019 मध्ये उदयसिंह उंडाळकर पृथ्वीबाबांच्या विरोधात उभे ठाकले.मात्र, तिथही त्यांना निराशाच आली.
पण, आता हे वैर संपलंय… आणि हे वैर संपवण्यात गृह राज्यमंत्री सतेज पाटलांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटलांनी उंडाळकरांची राजविलास पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली आणि वैर संपवत दिलजमाई करण्याकडे पहिलं पाऊल टाकलं.
कराड हा काँग्रेसचा गड. मात्र, एवढी वर्ष या गडाला 2 किल्लेदार होते. जे आता निवृत्त होणार आहेत. विलासकाका उंडाळकर आता 82 वर्षांचे आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण 74 वर्षांचे.
विलासकाकांनी आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यापुढं निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यामुळंच पृथ्वीबाबा आणि विलासकाकांचा राजकीय वारसदार म्हणून उदयसिंह पुढं आले आहेत.
काँग्रेसमधील चव्हाण आणि पाटील गटाचं आता विलिनीकरण होत आहे. त्यामुळं आता कराड मतदारसंघात आता काँग्रेस अधिक मजबूत होईल यात शंका नाही.
कराड दक्षिणला आतापर्यंत तीनच आमदार!
कराड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच विधासभेचे आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी कराड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले. अशा प्रकारे कराड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत तीनच आमदार पाहिले आहेत.
(Prithviraj Chavan vs Vilaskaka Patil Undalkar)
संबंधित बातम्या
कट्टर विरोधक एकत्र, पृथ्वीबाबा-विलासकाका उंडाळकर यांची दिलजमाई, सातारा काँग्रेसची ताकद वाढणार
कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध विलासराव देशमुखांचा जावई