वाशीममध्ये आघाडी-युतीसमोर अंतर्गत आव्हान, अपक्षही ठरणार अडसर
वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आणि नाराज नेते, कार्यकर्त्यांचे मोठे आव्हान असून अपक्ष उमेदवारही त्यांच्यासाठी अडसर ठरणार आहेत. स्वतंत्र वाशीम मतदार संघात 2 वेळा आणि यवतमाळ वाशीम मतदार संघात 2 वेळा अशा सलग 4 वेळा विजयी ठरलेल्या भावना गवळी यांची या […]
वाशीम : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आणि नाराज नेते, कार्यकर्त्यांचे मोठे आव्हान असून अपक्ष उमेदवारही त्यांच्यासाठी अडसर ठरणार आहेत.
स्वतंत्र वाशीम मतदार संघात 2 वेळा आणि यवतमाळ वाशीम मतदार संघात 2 वेळा अशा सलग 4 वेळा विजयी ठरलेल्या भावना गवळी यांची या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी लढत होणार आहे. मराठा, बंजारा आणि मुस्लीम बहुल असलेल्या या मतदारसंघातील जातीय समीकरणे माणिकरावांच्या उमेदवारीने काही प्रमाणात बदलणार आहेत. दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीकडून प्राध्यापक प्रवीण पवार यांना देण्यात आलेल्या उमेदवारीने मतांचे विभाजन होणार असल्याचा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे.
वाशीम परिसरातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करणे, कार्यकर्त्यांच्या मदतील उभे राहणे या कार्यशैलीमुळे भावना गवळी यांनी मतदारसंघात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी आहे. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचाही वाशीम जिल्ह्यासोबत कायम संबंध राहीला आहे. त्यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव असणाऱ्या काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांची प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा या 2 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले आहेत. मध्यंतरी राज्यपातळीवर भाजप-शिवसेनेमध्ये झालेल्या सुंदोपसुंदीचे काहीसे पडसाद जिल्ह्यातही पहावयास मिळाले. या दोन्ही पक्षात जिल्ह्यात म्हणावे तेवढे सख्य दिसून येत नसून त्यामुळे युतीचा धर्म कशाप्रकारे निभावला जातो यावर निवडणुकीचे बरेचशे चित्र अवलंबून आहे.
काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या उमेदवारीने वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होणार असल्याचे बोलल्या जात आहे. बहुजन वंचित आघाडीकडून प्रा. पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी ही यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्येने असलेल्या बंजारा मतांवर लक्ष ठेवून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच बहुसंख्य समाजातील मतांची होणारी विभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासमोर पक्षांतर्गत शीतयुद्धाचे मोठे आव्हान आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग मनापासून दिसून आलेला नाही. त्यामुळे त्यांना सेना व भाजप कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. भावना गवळी राजकीय डाव खेळत माझी बहुजन वंचित आघाडीसोबत थेट लढत असल्याचे सांगत असल्या, तरी ठाकरे आणि गवळी या दोन्ही उमेदवारांमध्येच सरळ काट्याची लढत होणार असे दिसत आहे. त्यांच्या समोर अपक्ष उमेदवार भाजपचे प्रदेश सरचिटणीस पी. बी. आडे, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार प्रा. प्रवीण पवार, प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे आणि अपक्ष उमेदवार आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांचेच आव्हान असल्याचे चित्र आहे.