ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोविड काळात अनधिकृत बांधकामानी डोके वर काढले. त्यामुळे आगामी काळात ठाणे काँग्रेसच्यावतीने अनधिकृत बांधकाम विरोधात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामाचा ठाणे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांला दर महिन्याला 3 कोटीचा हप्ता मिळत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे (Allegation of Corruption on Thane MC officer by Congress).
अनधिकृत बांधकामांसाठी दरमहा 3 कोटी रुपयांची लाच घेणारा ठाणे महापालिकेतला तो अधिकारी कोण? असा प्रश्न सध्या ठाण्यात विचारला जातोय. या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी देखील काँग्रेस नगरसेवक आणि ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने सोमवारी (21 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत आपली आगामी भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, शहर काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन शिंदे, प्रवक्ते गिरीष कोळी आणि सरचिटणीस विजय बनसोडे हेही उपस्थित होते.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने या बांधकामाविरोधात आणि या बांधकामांना अभय देणाऱ्या सर्वच घटकांविरोधात आंदोलनाची घोषणा केलीय. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारपासून होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. खरंतर नवीन आयुक्तांकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. परंतु, काही अधिकारी आणि बांधकाम माफियांच्या संगमताने ही बाधकामं सुरूच आहेत, असा आरोप काँग्रेसने केलाय.
अनधिकृत बांधकाम आणि फेरिवाल्यांकडून काही अधिकाऱ्यांना 3 कोटी रुपयांचा हप्ता पोहचत असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केलाय. त्यांनी या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचीही मागणी केली. अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचं एक रॅकेट आहे, असाही आरोप होतोय. आता काँग्रेसचे पदाधिकारी ठिकठिकाणी प्रभाग समिती कार्यालयांसमोर आंदोलन करून विरोध करणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारपासून करण्यात येणार आहे. दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
ठाणेकरांनो सावधान ! एका वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 27 लाखांवर?
पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती
Allegation of Corruption on Thane MC officer by Congress