शिंदे गटात सामील व्हा नाही तर…. नवी मुंबईच्या पोलिस उपायुक्तांनी धमकवल्याचा खळबळजनक आरोप
शिंदे गटात सामील होण्यासाठी नवी मुंबईच्या पोलिसांनी धमकवल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे.
नवी मुंबई : राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असे मिलींद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच शिंदे गटात सामील होण्यासाठी नवी मुंबईच्या पोलिसांनी धमकवल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. नवी मुंबईतील एका माजी नगरसेवकाने हा आरोप केला आहे.
नवी मुंबईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक एम के मढवी यांनी हा गंभीर आरोप केला आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असल्याचा आरोप मढवी यांनी केला आहे.
शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी पोलीस उपयुक्तानी विवेक पानसरे यांनी धमकवलं असल्याचा दावा मढवी यांनी केला आहे.
वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये एम. के. मढवी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत.
शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची हालचाल नवी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याचा दावा मढवी यांनी केला आहे.
तडीपारीच्या नोटीस नंतर पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी मला थेट शिंदे गटात सामील होण्यासाठी धमकावल्याचा आरोप मढवी यांनी केला आहे.
तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील व्हा नाही तर तुम्हाला तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू अशी धमकी दिल्याचा दावा मढवी यांनी केलाय.