भाऊ उपाध्यक्ष, तर पुतण्या राष्ट्रीय समन्वयक, मायावतींची घराणेशाहीकडे वाटचाल
मायावती यांनी रविवारी (23 जून) आपला भाऊ आनंद कुमारला पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक करण्याची घोषणा केली. त्यानंतर मायावती देखील घराणेशाहीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नवी दिल्ली: बहुजन समाज पक्षाच्या (BSP) अध्यक्षा मायावती यांनी रविवारी (23 जून) आपला भाऊ आनंद कुमारला पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक करण्याची घोषणा केली. त्यानंतर मायावती देखील घराणेशाहीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आकाश आनंदने लंडनमधून एमबीएचे (MBA) शिक्षण घेतलेले आहे. बसपला ट्विटरसारख्या समाज माध्यमांवर सक्रिय करण्यात आकाशचा मोठा वाटा असल्याचेही सांगितले जाते. त्याचाच भाग म्हणून मागील काही काळापासून बसप प्रमुख मायावती यांनी आपली परंपरागत प्रतिमा मोडत ट्विटरचा वापर सुरु केला.
तरुण आणि नव्या मतदारांवर लक्ष्य केंद्रीत
मायावती यांना सध्याच्या काळात समाज माध्यमांचे महत्त्व लक्षात आले आहे. आकाशच्या मदतीने तरुण आणि नव्या मतदारांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असाही मायावतींचा विचार असल्याचे सांगितले जाते. त्याचाच भाग म्हणून बसपची सोशल मीडिया टीम मजबूत झाल्याचे पाहायला मिळाले.
मायावतींनंतर पक्षाची धुरा आकाश आनंदकडे जाणार का?
आकाश आनंद बसपाची कालसुसंगता टिकवून ठेवेल असाही विश्वास मायावतींना आहे. मागील काही काळापासून बसपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे यातून बाहेर पडून पुन्हा उभारी घेण्यासाठी मायावती नव्या नेतृत्वाकडे पक्षाची जबाबदारी देण्याची तयारी करत आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो. तसेच मायावतींनंतर पक्षाची धुरा आकाश आनंदकडे जाणार का? याचेही उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल.
मायावतींनी 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आकाश आनंदचे सहारनपूरमधील रॅलीत नियोजितपणे लाँचिंग केले होते. मायावतींच्या जन्मदिनासोबतच राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या मायावतींसोबतच्या भेटीवेळीही आकाश उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले होते.
‘माध्यमं दलितविरोधी मानसिकतेची’
दुसरीकडे आकाशविरोधात माध्यमांमध्ये होत असलेल्या वृत्तांकनावर मायावतींनी जोरदार टीका केली आहे. संबंधित माध्यमं दलितविरोधी मानसिकतेची असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मायावती म्हणाल्या, “आकाशला मुद्दाम या वादात ओढले जात आहे. घराणेशाहीचा आरोप लागू नये म्हणून माझ्या भावाने स्वतः राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ही माध्यमं दुसऱ्या पक्षांमधील घराणेशाहीवर डोळे बंद करुन घेतात.”