मुंबई – राज्यातील शाळा (School) एप्रिल (April) आणि मे महिन्यात सुटीमुळे बंद राहणार आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहाराचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देणे शक्य होणार नाही. म्हणून एप्रिल आणि मे या दोन महिन्यासाठी शालेय पोषण आहाराचे काम करणाऱ्या महिला सहकारी संस्थांना दोन महिने कच्चे धान्य पुरवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केली आहे.
असंख्य शाळांना एप्रिलमध्येच सुटी मिळणार आहे
शालेय अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असेल अशा शाळा 30 एप्रिल 2022 पर्यंत सुरू ठेवण्याची गरज नाही, असे सुधारित आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे असंख्य शाळांना एप्रिलमध्येच सुटी मिळणार आहे. पण ज्या शाळांचा अभ्याक्रम पुर्ण झालेला नाही अशा शाळा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत.
दोन महिने शाळांना सुट्या असणार आहे
या महिन्यातही विद्यार्थी फक्त परीक्षा देण्यासाठी दोन-तीन तासाकरता शाळेत येत आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहार योजनेतून या विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे अन्न शिजवून देण्यासाठी स्वयंपाकी ठेवणे, किचन चालवणे, अन्न धान्याचा साठा करणे हे अवघड झाले आहे. पुढे जवळपास दोन महिने शाळांना सुट्या असणार आहेत. म्हणून या दोन महिन्यासाठी या महिला सहकारी संस्थांना कच्चे धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, अशी मागणी प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.