मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी, प्रत्येकाला किती मोजले?; अंबादास दानवेंनी सांगितला आकडा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाड्यानं लोक आणले जात असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद : उद्या पैठणमध्ये (Paithan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा होणार आहे. मात्र ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेबाबत एक पत्र व्हायरलं झालं होतं. या पत्रामध्ये तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला यावे अशी सूचना देण्यात आली होती. मात्र हे पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाड्यानं लोक आणले जात असल्यांचं दानवे यांनी म्हटलं आहे.
दानवेंनी नेमकं काय म्हटलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या पैठणमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी झाली होती. मात्र पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भूमरे यांच्या सभेला गर्दी झाली नाही. जेमतेम शंभर लोकही नव्हते.
त्यामुळे आता शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे हे पैठणमध्ये सभा घेत आहेत. मात्र सभेला गर्दी जमवण्यासाठी यांना भाड्यानं लोक आणावे लागत आहेत. सभेला येण्यासाठी प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जात असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
ते पत्र बनावट
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये उद्या सभा होणार आहे. या सभेबाबत एक पत्र व्हायरलं झालं आहे. या पत्रातून अंगनवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाकडून या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. हे पत्र बनावट असून, यामाध्यमातून बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे.