दुर्दैव!! मुख्यमंत्र्यांना ज्योतिष्याकडे जायला वेळ, कामाख्या देवीलाही जाणार, पण… अंबादास दानवेंचा प्रहार!
केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार असलं तरीही हा पक्ष महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, अशी खंत अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
दत्ता कनवटे, औरंगाबादः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) ज्योतिष्याकडे, मांत्रिकाकडे जायला वेळ आहे. आता कामाख्या देवीलाही जाणार आहेत. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासाठी वेळ नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. औरंगाादमध्ये त्यांनी टीव्ही 9 शी बातचित केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरही सरकारने कठोर भूमिका घ्यावी, हा असंख्य नागरिकांचा, हजारो मराठी भाषिकांचा प्रश्न आहे, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.
अंबादास दानवे म्हणाले, कर्नाटक सीमेवरील गावांचं प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. संसदेनं या प्रकरणी निर्णय घ्यावा, असं कर्नाटकने म्हटलं आहे. केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार असलं तरीही हा पक्ष महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, अशी खंत अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचं ट्विट आणि फडणवीस यांची भाष्य हा केवळ दिखावा आहे. कर्नाटकात गेलेली गावं ही मराठी बहुभाषिक आहेत. ती महाराष्ट्रात आली पाहिजे, ही शिवसेनेची सातत्याने केलेली मागणी आहे. सरकार याकडे उघड्या डोळ्याने पाहतंय, त्यामुळे त्यांनी कडवट भूमिका घ्यायला पाहिजे, असं दानवे म्हणाले.
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात श्रद्धाने आफताबची तक्रार करणारे पत्रही लिहिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात येतोय. राम कदम यांनीही आरोप केलाय. यावर अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. राम कदम स्त्रियांविषयी काय काय बोलतात, पळवून नेण्याची भाषा करतात, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला अर्थ नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या बिहार भेटीबद्दल अंबादास दानवे म्हणाले, हा देश आजच्या घडीला वेगवेगळ्या भावनेने विभागला जातोय. देश संघटीत करण्यासाठी देशातले काही युवक पुढाकार घेत आहेत. सर्व देशाने त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले.