“राज्यपाल कोश्यारी जी विधानं करतात, ती दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर!”, दानवेंचा गंभीर आरोप
दानवेंची कोश्यारींवर टीका, म्हणाले...
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर चहूबाजूने त्यांच्या या विधानाचा निषेध होतोय.भाजपची यावर काय भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ठाकरेगटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या बोलण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केलाय.
भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधानं करतात. महात्मा फुलेंविषयी, शिवरायांबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी आक्षेपार्ह विधानं करतात, ती दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर करतात, असं दानवे म्हणाले.
कोश्यारी सातत्याने अशी गंभीर विधानं करतात. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही त्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही, असं दानवे म्हणालेत.
कोश्यारी यांचं वादग्रस्त विधान
तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.
छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आदर्श आहेत. मागच्या पिढीचे, आताच्या पिढीचे आणि येण्याच्या कित्येक पिढ्यांसाठी त्यांचं कार्य कायम आदर्श राहील. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असणाऱ्या शिवरायांविषयी एकही वाईट शब्द खपवून घेणार नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.