…तर रस्त्यावर उतरणार, सत्तार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवे आक्रमक
शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.
औरंगाबाद : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. बळीराजा हवालदिल आहे. शेतकरी नुकसानभरपाईकडे डोळे लावून बसला आहेत. मात्र दुसरीकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे. यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadanas Danve) यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यंदा राज्यात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या शेतात गुडगाभर पाणी आहे, आताचे पीक तर हातचे गेले मात्र पुढचे पीक देखील शेतकऱ्यांना घेता येते की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी दानवे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर
दरम्यान आज उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत . ते अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.