तीन तास ऑफिसबाहेर बसवूनही अमित शाह खडसेंना भेटलेच नाहीत; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा
आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपाच्या खासदार रक्षा खडसे या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. या भेटीबाबत मोठी बातमी आता समोर आली आहे.
जळगाव : आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपाच्या (BJP) खासदार रक्षा खडसे या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते, त्यानंतर एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील केला होता. मात्र आता या भेटीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल तीन तास वेटींगवर ठेवूनही अमित शाह यांनी खडसेंना वेळ दिला नाही, अमित शाह यांनी खडसेंची भेट घेतली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
नेमकं काय म्हटले गिरीश महाजन?
एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. मला त्याबाबत फोन देखील आले. मला याबाबत समजल्यानंतर मी रक्ष खडसे यांना फोन करून भेटीबाबत माहिती घेतली. तेव्हा त्यांनीच सांगितलं की आम्ही तीन तासांपासून अमित शाह यांच्या ऑफिसबाहेर बसलेलो आहोत. मात्र तीन तास वेटींगवर ठेवून देखील त्यांनी भेटीला नकार दिला. तीन तास बाहेर बसून देखील अमित शाह आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली नसल्याची निश्चित माहिती मला मिळाल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
महाजनांचा खडसेंना सबुरीचा सल्ला
दरम्यान यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला देखील लगावला आहे. खडसे गेले 40 वर्ष भाजपामध्ये होते, त्यांना अनेक पदे देण्यात आली मात्र तरी देखील त्यांची भाजपमध्ये घुसमट झाली. आता एकच वर्षापूर्वी ते राष्ट्रवादीत गेले आता तिकडेही त्यांची घुसमट सुरू झाली आहे. त्यांची लगेच घुसमट कशी सुरू होते हे काय मला कळत नाही. मात्र त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र अमलात आणावा असा सल्ला महाजन यांनी खडसेंना दिला आहे.